विधानसभा 2019: ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात; आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर!

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अशी बातमी समोर येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 07:34 AM IST

विधानसभा 2019: ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात; आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर!

मुंबई, 30 सप्टेंबर: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अशी बातमी समोर येत आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. युती, आघाडी यांच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार यासाठी देखील चुरस सुरू आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेने(Shiv Sena)ने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणू्क लढवणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढवणार यासंदर्भात चर्चा सुरू होती. आता त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) विधानसभेची निवडणू्क लढवणार आहेत. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभेतून उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे. येथील विद्यमान आमदारांच्या ऐवजी आदित्य ठाकरे यांना संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे प्रथमच घडत आहे की ठाकरे कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यासंदर्भातील वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. अर्थात शिवसेनेने अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आदित्य ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

काल (रविवारी) शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म वाटले होते. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील मतदारसंघातील उमेदवारांना घटस्थापनेच्या मुहुर्तावर AB फार्म वाटले होते. आमदार गौतम चाबुकस्वार- पिंपरी,,भास्कर जाधव- गुहागर,संग्राम दादा कुपेकर- चंदगड,सुजित मिणचेकर-हातकणंगले,योगेश रामदास कदम- दापोली,यामिनी यशवंत जाधव-भायखळा,संजय शिरसाट- औरंगाबाद,संतोष बांगर -हिंगोली,राजेश क्षीरसागर- कोल्हापूर,दीपक केसकर- सावंतवाडी,संजय बाबा घाडगे-कागल,चंद्रदीप नरके- करवीर,डॉ. सुजित मिणचेकर-हातकणंगले,सत्यजीत पाटील- शाहूवाडी,प्रकाश आबिटकर- राधानगरी,उल्हास पाटील-शिरुर,गुलाबराव पाटील-जळगाव (ग्रामीण),किशोर पाटील-पाचोरा,लता चंद्रकांत सोनवणे-चोपडा,दादाजी भुसे-नाशिक,नितीन देशमुख-बाळापूर,अर्जुनराव खोतकर- जालना,विश्वनाथ सानप- रिसोड,राजन साळवी- राजापूर,उदय सामंत- रत्नागिरी,सदानंद चव्हाण-चिपळूण,वैभव नाईक- कुडाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले होते की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की एक शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर बसेल. त्यामुळेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य यांचे नावाची चर्चा सुरु झाली आहे. काही शिवसैनिकांनी तशी मागणी देखील केली आहे. अर्थात भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीवर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या भाजपकडे 135 तर शिवसेनेकडे 75 आमदार आहेत.

Loading...

ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. पण स्वत: त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. 1995मध्ये जेव्हा राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले तेव्हा देखील बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले. त्यानंतर उद्धव असतील किंवा राज ठाकरे यांनी देखील निवडणूक लढवली नाही. पण 2014नंतर मात्र ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढवेल अशी चर्चा सुरु झाली. आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून ते निवडणू्क लढवतील अशी चर्चा सुरु होती. यावेळी तशी वातावरण निर्मिती देखील तयार करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरु केली होती. शिवसेनेकडून आदित्य यांनाच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून समोर आणले जात आहे. आदित्य यांना मैदानात उतरवल्याने शिवसेनेने आपली भविष्यातील राजकीय दिशा निश्चित केल्याची चर्चा आहे. दरम्यान, आदित्य यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल काही शिवसैनिकांनी अभिनंदन करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 07:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...