विधानसभेच्या अध्यक्षपदावरुन शिवसेनेत संघर्ष दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य शिवसेना (Shiv Sena) ही महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) आहे. तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही अर्थातच भाजपसोबत (BJP) आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने उमेदवार उभे करण्यात आले आहे. भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदार राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा देखील व्हीप लागू केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपुढे पेच वाढण्याची शक्यता आहे. (अमित ठाकरेंचा मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध, मनसे-भाजप आमनेसामने येणार?) शिवसेनेच्या सुनील प्रभूंचा व्हिप ऐकला नाही तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून अधिकृतपणे कदाचित कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करणं शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करतं हे उघडपणे स्पष्ट होणार आहे. आमदार गोव्याच्या विमानतळावर दाखल झाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या आमदारांसोबत होते. गोवा विमानतळावर दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपण सर्व आमदारांना घेऊन मुंबईत जात असल्याची माहिती दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या व्हीपबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी शिवसेनेचा व्हीप आपल्याला लागू होऊ शकणार नाही, असं विधान केलं. "व्हीप आमच्यावर लागू होणार नाही. कारण शिवसेनेचं दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हीप आम्हाला लागू होत नाही. आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामारं जाणार आहोत", असं एकनाथ शिंदे म्हणाले.शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला रवाना, विमानातला पहिला VIDEO समोर #ShivSena #ShivSenaRebelMLA #Maharashtra pic.twitter.com/oC3D3G7Wew
— News18Lokmat (@News18lokmat) July 2, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.