Home /News /mumbai /

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन

महाविकास आघाडी सरकारवर संकट कोसळलेलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

  मुंबई, 26 जून : महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) संकट कोसळलेलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन केला आहे. याबाबतचं वृत्त 'आजतक'ने दिलं आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. ते दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. शिंदे यांच्या पाठिमागे शिवसेनेच्या भल्यामोठ्या आमदारांची संख्या आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा खिंडार पाडण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या सगळ्या घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी कुठेही वाच्यता केलेली नव्हती. ते आता घरी आल्याने काही बोलणार का? शिवसेना आज धोक्यात असल्याने त्यांच्या मदतीला राज ठाकरे जाणार का यावर जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याची बातमी समोर आली आहे. (पुढच्या 12 तासांमध्ये ठरणार महाविकास आघाडीचं भवितव्य, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत घडामोडींना वेग) राज ठाकरे 18 जूनला मुंबईतल्या लिलावती रुग्णलायत दाखल झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. याआधी एक जूनला शस्त्रक्रिया होणार होती. पण राज ठाकरे यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

  टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढल्याने मे महिन्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर तब्येतीच्या कारणाने त्यांनी नियोजित अयोध्या दौराही त्यांनी थांबवल्याचे जाहीर केले होते.

  शिंदे गट मनसेत विलीन होणार? एकनाथ शिंदे यांना जवळपास 38 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळू शकतं. शिंदे गटाकडून आपण शिवसेनेतच असल्याचा दावा केला जातोय. शिंदे गटाकडून आपल्याकडे एक तृतीयांश आमदारांची संख्या असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आपला पक्ष हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचाच पक्ष आहे, असं सांगितलं जात आहे. पण शिवसेनेकडून शिंदे गटाविरोधात कायदेशीर लढाई लढली गेली आणि त्यांचा पराभव झाला तर शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी चर्चा सध्या सुरु आहे. याशिवाय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गटाच्या आमदारांना भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही, असं म्हटलं आहे. शिंदे या दोन्ही पक्षात विलीन झाले नाहीत आणि त्यांना विलीन होण्याची वेळ आली तर त्यांच्यासमोर मनसेचा देखील एक पर्याय खुला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेची जवळीक वाढल्याचं देखील चित्र आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये तशा घडामोडी घडल्या तर आगामी काळातील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये अभूतपूर्व असा बदला झालेला दिसण्याची शक्यता आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  Tags: Eknath Shinde, Maharashtra News, MNS, Raj Thackeray

  पुढील बातम्या