ठाणे, 17 डिसेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आता भाजपवर पलटवार करण्यास सुरूवात केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नगरसेवक संजय वाघुले यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत आमदार सरनाईक यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. याबाबत त्यांनी थेट लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) लेखी तक्रार दिली आहे. कोविड सेंटरमधील शेठ ग्रुप वाहनतळाबाबतही सखोल चौकशीची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
हेही वाचा...ज्याला मेसेज येणार त्यालाच कोरोना लस मिळणार,आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ACB कडे दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, दि.16 डिसेंबर 2020 रोजी भारतीय जनता पार्टी पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या व ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक संजय वाघुले यांनी एक पत्रकार परिषद आयोजित घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी माझ्यावर विविध आरोप केले होते. त्या आरोपांच्या अनुषगांने किरीट सोमय्या व इतर लोकांवर मी 100 कोटी रूपये अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस दिलेली आहे.
न्यायालयामध्ये त्या बाबतीतला निर्णय होईलच परंतु त्याच पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या व संजय वाघुले यांनी राज्य शासन, सिडको, एम.एम.आर.डी.ए. व ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये व्होल्टास कंपनीच्या भुखंडावर व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर जे दोन कोविड सेंटर उभारले जात आहेत. त्यापैकी व्होल्टास कंपनीच्या भुखंडावर उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरबाबत आक्षेप घेतला आहे. एका प्रतापी आमदाराच्या आग्रहास्तव ह्या कोविड सेंटरचे काम चालू आहे. ठाणे शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्यामुळे सगळे कोविड सेंटर रिकामे असल्यामुळे आता एकाही कोविड सेंटरची गरज नाही, अशी अनेक पत्रकारांना माहिती दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता....
जागतिक आरोग्य संघटनेने तसेच राज्य शासनाच्या टास्क फोर्सने जगातील अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांप्रमाणेच भारतामध्ये सुद्धा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्यामुळे राज्य शासनाने सर्व महापालिकांना दिलेल्या सुचनेनुसार दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून तातडीची उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक महानगरपालिकेला तात्पुरत्या स्वरूपातील कोविड सेंटरची निर्मिती करून दक्ष राहण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेप्रमाणे इतर ठिकाणी देखील रुग्ण संख्या कमी होत असतानाही कोविड सेंटरची निर्मिती होत आहे, असे असतानाही एका प्रतापी आमदाराच्या हट्टामुळे हे कोविड सेंटरचे काम चालू आहे. अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे. योगायोगाने व्होल्टास कंपनीच्या जागेवर व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या दोन्हींही कोविड सेंटर हे माझ्याच मतदारसंघात येत असल्याने किरीट सोमय्या व संजय वाघुले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत असल्याच आमदार सरनाईक यांनी म्हटलं आहे.
भ्रष्टाचाराचा दुर्गंध...
फक्त व्होल्टास कंपनीच्या जागेवर होत असलेल्या कोविड सेंटरबद्दल आक्षेप घेतला याबद्दल माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली असून यामध्ये भ्रष्टाचाराचा दुर्गंध येत आहे, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. याचे कारण जर ठाणे शहरामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने कोविड सेंटरची गरज नसेल तर व्होल्टास कंपनीच्या जागेवरील कोविड सेंटर व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या कोविड सेंटर या दोन्हीं कोविड सेंटरबद्दल किरीट सोमय्या व संजय वाघुले यांनी आक्षेप घेणे गरजेचे आहे. कारण राज्य शासनाचे पैसे वाचवायचे असतील तर हे दोन्ही कोविड सेंटरचे काम थांबवले पाहिजे, असं त्यांनी म्हणायला हवं होतं. कारण व्होल्टास कंपनीच्या जागेवरील कोविड सेंटरचा खर्च अंदाजे 13 कोटी व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या कोविड सेंटरचा खर्च 23 कोटी असल्याची माहिती मला महानगरपालिकेतून मिळालेली आहे. त्याचबरोबर संजय वाघुले नगरसेवक असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेमध्ये या दोन्हीं कोविड सेंटरना मंजुरी मिळालेली आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने सुध्दा या दोन्हीं विषयांना एकाच सभेमध्ये मंजुरी दिलेली आहे.
हेही वाचा...पुण्यात अधिकाऱ्याचा राजीनामा, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
ठाणे शहरामध्ये चुकीच्या पध्दतीनं काम होत असल्यास त्या गोष्टी निदर्शनास आणून देणं हे योग्यच असून किरीट सोमय्या व विद्यमान नगरसेवक संजय वाघुले यांचे कर्तव्यच आहे. परंतु त्यांनी माझ्या मतदारसंघात होत असलेल्या या दोन्हीं कोविड सेंटरबद्दल एकत्रीतरित्या आक्षेप घेणं गरजेचं असूनही त्यांनी तसे केलं नाही. कारण संजय वाघुले यांनी ठाण्यातील खोपट येथील हायवेनजीक असलेल्या देवकार्पोरा इमारतीमधील शेठ ग्रुपच्या वाहन तळावरील होत असलेल्या कोविड सेंटरच्या कार्यालयातील कन्सलटन्ट बरोबर त्यांची बैठक झाल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याद्वारे एका व्यक्तीने माझ्याकडे केलेली आहे. त्यामुळे शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होणाऱ्या कोविड सेंटरबद्दल आक्षेप न घेता फक्त व्होल्टास कंपनीच्या जागेवर होत असलेल्या कोविड सेंटरबद्दल आक्षेप घेतल्यामुळे कदाचित या मागे भ्रष्टाचार तर नाही ना? अशी शंका प्रताप सरनाईक यांनी उपस्थित करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व नगरसेवक संजय वाघुले या दोघांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.