भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला.. संजय राऊतांनी पुन्हा सोडले टीकास्त्र

भाजपने 24 तासांत दावा करायला हवा होता. कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 10:58 AM IST

भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला.. संजय राऊतांनी पुन्हा सोडले टीकास्त्र

मुंबई,10 नोव्हेंबर: सत्तास्थापनेतील शिवसेना-भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला. भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले असताना दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. बहुमत विकत घेऊ शकतो, भाजपच्या या भ्रमाचा भोपळा फुटला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. सत्तास्थापनेसाठी कोणी तयार नसेल तर सेना जबाबदारी घेईल. शिवसेना राजकारणाचा व्यापार करत नाही, असेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

बहुमत सिद्ध करण्यासाठी शुभेच्छा..

बहुमत सिद्ध करण्यासाठी संजय राऊत यांनी भाजपला शुभेच्छाही दिल्या आहेत. भाजपने 24 तासांत दावा करायला हवा होता. कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. अयोध्याप्रकरणाचा निकाल कुण्या एका पक्षाचा नाही. अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाला हा संपूर्ण देशासाठी असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री होणार? भाजपसमोर 3 पर्याय पण...

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी सर्वात मोठा पक्ष भाजपला आमंत्रण दिलं आहे. सेना-भाजपने युती करून निवडणूक लढवली. पण बहुमताचा आकडा गाठल्यानंतर दोन्ही पक्षातील वाद वाढला. निकालानंतर त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून एकमत झाले नाही आणि युतीची चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर शुक्रवारी 8 नोव्हेंबर रोजी 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला पण भाजपला सरकार स्थापन करता आले नाही. त्यानंतर पुढच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत त्यांच्याकडे काळजावाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Loading...

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं असलं तरी सभागृहात विश्वास ठराव जिंकण्यासाठी आवश्यक बहुमताचा आकडा मिळवणं त्यांच्यासमोर आव्हान असेल. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. परंतु, दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळाली. आता फडणवीस यांना आपल्याकडे बहुमतासाठी किती आमदार आहे, किती जणांचा पाठिंबा आहे, हे सांगावं लागेल. त्यानंतर बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

राज्यात सत्ता स्थापनेसाठी सध्या काही पर्याय आहेत त्यामध्ये नवी राजकीय समीकरणं, दुसऱ्या पक्षांचे आमदार फोडणे. यातील नव्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपला सेना वगळता कोणताही पक्ष पाठिंबा देईल अशी चिन्हे नाहीत. सेनेसोबत कोणतीच तडजोड होऊ न शकल्याने फडणवीस यांनी, 'युती तोडायची की नाही सेनेनं ठरवावं' असंच जाहीर करून टाकलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही, मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलं होतं आणि मी बाळासाहेबांना वचन दिलं ते पूर्ण करणारच, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, भाजपने चर्चेचा पर्याय अजूनही खुला ठेवला आहे.

भाजप-सेना यांच्यात काही तडजोड झाली नाही तर शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा देऊन सरकार स्थापन होऊ शकते. यावेळी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल पण सेनेसोबत जाण्यास पक्षश्रेष्ठींचा नकार आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही विरोधी पक्षातच बसू असं सांगितलं असल्यानं त्याचीही शक्यता कमी आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र यावेळी असं होण्याची शक्यता दिसत नाही.

सत्ता मिळवायची असेल तर भाजपसमोर राजकीय पक्षातील आमदार फोडावे लागतील. त्यातही देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही असं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. भाजपला 145 चा आकडा गाठण्यासाठी आणखी 40 आमदारांची गरज आहे. त्यांना काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. तरीही बहुमताच्या आकड्यासाठी आणखी आमदारांची गरज आहे.

राजकीय पक्षातील आमदार फोडण्याआधी भाजपला पक्षांतर बंदी कायद्याचे आव्हान लक्षात घ्यावं लागणार आहे. घटनेच्या 69 व्या दुरुस्तीनुसार एखाद्या पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांपैकी दोनतृतीयांश आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला किंवा दुसऱ्या पक्षाची वाट धरली तर पक्षांतर बंदी लागू होत नाही. त्यामुळे आता आमदार फोडायचे असतील तर निवडून आलेल्या सदस्यांच्या दोन तृतीयांश आमदार फोडावे लागतील.

निवडणुकीआधीच इतर पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातील काहींचा पराभव झाला आहे. आता निवडून आलेल्या आमदारांमधील दोन तृतीयांश आमदरांना फोडणं सोपं नाही. त्यामुळे भाजपसमोर सध्या फक्त शिवसेनेसोबत काही तडजोड होते का हे पाहणं हाच पर्याय असू शकतो.

भाजप-सेनेच्या वादात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसने तर आपले आमदार फुटू नये म्हणून जयपूरला हलवले आहे. शरद पवार यांनी आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश दिला असं सांगत आहे. काँग्रेसनेही त्यांचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. त्यामुळे भाजपने जर सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरली तर काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

पक्षीय बलाबल

भाजप- 105

शिवसेना- 56

राष्ट्रवादी- 54

काँग्रेस- 44

मनसे- 01

इतर- 28

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...