अडीच नव्हे 5 वर्षे असेल शिवसेनेचा मुख्यमंत्री, संजय राऊतांचा नवा दावा

अडीच नव्हे 5 वर्षे असेल शिवसेनेचा मुख्यमंत्री, संजय राऊतांचा नवा दावा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करावे, ही जनतेची इच्छा...

  • Share this:

मुंबई,22 नोव्हेंबर: महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक विराजमान होणार आहे. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा नवा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी सकाळी केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्त्व करावे, याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात एकमत झाल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आता इंद्रपद दिलं तरी माघार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, महाराष्ट्राला लवकरच कणखर नेतृत्त्व मिळणार आहे. महाराष्ट्रात शिवसैनिकच मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहे. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाही, असे सांगत राऊत यांनी दैनिक 'लोकसत्ता'च्या वृत्ताचे खंडन केले आहे. मुख्यमंत्रिपदाचे काय इंद्रपद दिलं तरी आता माघार नाही, असे सांगत राऊत यांनी भाजप टोला लगावला आहे.

संजय राऊतांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांची नावे चर्चेत होती. आदित्य ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांच्या नावाला पसंती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व करावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्त्व करावे, याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात एकमत झाले आहे.

महाविकास आघाडीचं ठरलं, असा आहे सत्तेचा नवा फॉर्म्युला!

सत्तेचा पेच सोडविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आणि निर्णायक टप्प्यावर आलीय. सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस कार्यकारिणीत शिक्कामोर्तब झालंय. महाविकासआघाडी असं नव्या आघाडीचं नाव असणार आहे. महाशिवआघाडी हे नाव सेनेनं सुचवलेलं होतं पण काँग्रसने सेनेचा हा प्रस्ताव मान्य केला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. किमान समान कार्यक्रमावरही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तर समन्वयासाठी समन्वय समितीची स्थापना केली जाणार असल्याचीही माहिती पुढे आलीय.

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. काँग्रेस थेट शिवसेनाला पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याचे पत्र देणार आहे. सत्तेचा नवा फॉर्म्युला आता तयार झाला असून 11-11-11 या सूत्रानुसार सत्तेचं वाटप होणार आहे.

मुख्यमंत्रिपदाची विभागणी होणार?

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्याबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म शिवसेनेला मिळेल, अशी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही वरिष्ठ नेत्यांकडून 'न्यूज18 लोकमत'ला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाबाबत माहिती मिळाली आहे. आगामी मंत्रिमंडळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर धुरा देण्याचं ठरवलेलं दिसत आहे. आघाडी सरकारमध्ये सामील असलेले अनेक नेते पुन्हा नव्या मंत्रिमंडळातही दिसण्याची शक्यता आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 22, 2019, 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading