मुंबई, 22 डिसेंबर: 'हे फुटतील, इतके फुटतील, अशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात आहे. थोडे दिवस थांबा काय काय फुटणार आहे ते बघाच. भविष्यात जे जे घडणार आहे, राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदु शिवसेना भवनच (Shiv Sena Bhavan, Mumbai)असेन, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संकेत देत भाजपला सुनावलं.
भाजपची नाशिकमधील उद्योग आघाडी आता आपल्याकडे आली आहे. त्यामुळे भाजपकडे आता उद्योग राहिलेले नाहीत, अशी खोचक टीका देखील संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा...बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीनंतर भाजपमध्ये उभी फूट, शेकडो कार्यकर्ते नाराज
नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (balasaheb Sanap) यांनी 'शिवबंधन' तोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले, बाळासाहेब सानप शिवसेनेत आल्यानंतरही फायदा झाला नव्हता. आमचा एकही फुटणार नाही असं ते म्हणत आहेत. पण आता थोडे दिवस थांबा. भूकंपाचा केंद्रबिंदु शिवसेना भवनच असेल, असा टोला देखील संजय राऊत यांनी भाजपला लगावला. आता इनकमिंग फक्त एकाच पक्षातून होणार आहे. महाविकास आघाडी सरकार पुढील 20-25 वर्षे टिकावं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे राजकारण करावं, असं जनतेला वाटत आहे. कार्यकर्ते जमिनीवर पाय रोवून असतात, तेव्हा नेते येतात की जातात याकडं लक्ष नाही द्यायचं, असंही राऊत यांनी सांगितलं. काहीही करून नाशिक महापालिकेवर यावेळी भगवा फडकवायचा आहे. तसंच धुळे महापालिकेवरही सत्ता मिळवू, असा विश्वास देखील संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला.
भविष्यात काहीही न करता भूकंप होतील...
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघात आता चाचणी झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रच होते. त्यामुळे भविष्यात काहीही न करता भूकंप होतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा...मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा.. असं म्हणत पठ्ठा थेट चढला टॉवरवर, पाहा VIDEOभाजपला भारतरत्न मिळायला हवा...
भाजपला टीका करण्यासाठी भारतरत्न मिळायला हवा, असा खोचल टोला संजय राऊत यांनी लगावला. बाहरेच्या देशात काय चाललंय बघा. पंतप्रधान बरेच दिवस परदेशी न गेल्यानं बाहेर काय चाललंय ते भाजपला माहिती नसावं, अशा शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. केंद्र सरकार दिल्लीत हतबल झालं आहे. असं गेल्या 50 वर्षात झालं नव्हतं, असंही राऊत यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.