हिंदू मंदिरे खुली करण्याबद्दल शिवसेना नेत्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र

हिंदू मंदिरे खुली करण्याबद्दल शिवसेना नेत्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र

पर्यूषण पर्व काळात जैन मंदिरे उघडण्याची सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : सध्या सुरू असलेल्या पर्यूषण पर्व काळात जैन मंदिरे उघडण्याची सशर्त परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. दरम्यानच्या काळात कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी, तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू याची हमी या मंदिरांनी द्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने या मंदिरांना दिले आहेत. यानंतर आता शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित सर्व हिंदू मंदिरे व इतर प्रार्थना स्थळे खुली करण्याबाबत मागणी केली आहे.

राज्य सरकारने राज्यात मॉल्स आणि इतर आर्थिक व्यवहार सुरू करण्याची अनुमती दिलेली असताना मंदिरांना मात्र अनुमती दिलेली नाही यावरून लोक प्रश्न विचारत आहेत. मॉल्स , मार्केट कॉम्प्लेक्स अशी गर्दीची ठिकाणे सुरु होऊ शकतात मग मंदिरे का नाही ? असा भाविकांचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे, असं प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

काय आहे प्रताप सरनाईक यांची मागणी?

"राज्य 'अनलॉक'च्या दिशेने वाटचाल करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरेदेखील उघडावीत, अशी मागणी भाविकांमधून मोठ्याप्रमाणात होत आहे. आता माननीय सुप्रीम कोर्टाने जर जैन मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असेल तर राज्यातील हिंदू धर्मियांची मंदिरे व इतर धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यायलाच हवा.

उद्यापासून श्री गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यानंतर नवरात्र उत्सव सुरु होईल. हिंदू धर्मियांचे हे सगळ्यात मोठे उत्सव आहेत. सर्वच धर्माचे भाविक आपापली प्रार्थना स्थळे खुली करण्याची मागणी सरकारकडे करीत आहेत. आज माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत , त्याचा अभ्यास करून आपण पुढील निर्णयाबाबत विचार करावा.

गेल्या 5-6 महिन्यात नागरिकांना सामाजिक अंतर कसे ठेवायचे व स्वतःची काळजी कशी घ्यायची हे समजले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जी नियमावली ठरवली आहे त्या नियमांचे पालन करण्याची हमी घेऊन , जैन मंदिराप्रमाणेच सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्यात परवानगी द्यायला हवी असे मला वाटते. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आपण हा निर्णय त्वरित घ्याल याची मला खात्री आहे," अशी आशा प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 21, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या