मुंबई, 30 नोव्हेंबर : हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेच्या नेत्याने मुंबईत अजान स्पर्धा आयोजित केल्याची बातमी समोर आल्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला. भाजपने या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरत टीकास्त्र सोडलं. मात्र आता ज्या शिवसेना विभाग अध्यक्षाने ही स्पर्धा घेतल्याची चर्चा होती, त्यानेच याबाबत खुलासा केला आहे.
'अजान स्पर्धेशी माझा संबंध नाही, या स्पर्धेचं आयोजन “फाऊंडेशन फॉर यू” या संस्थेकडून करण्यात आलं होतं. या संस्थेनं खुल्या स्वरुपात ही स्पर्धा आयोजित केली असल्याने मी त्याबाबत हरकत घेत ही स्पर्धा ऑनलाईन घ्यावी, असं सुचवलं आणि स्पर्धेला शुभेच्छा दिल्या,' असं शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं आहे.
स्पर्धेबाबत आधी काय होती सकपाळ यांची भूमिका?
'मुस्लिमांमधील लहान मुलं चांगली बोलतात तर त्यांची अजान स्पर्धा का घेऊ नये? ही अजान स्पर्धा घेतली तर त्या स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांना शिवसेना पारितोषिक देईल. प्रत्येक धर्मात अमन शांतीचा संदेश दिला आहे. महाआरती प्रमाणे अजान असतं... त्यामुळे त्यावर वाद निर्माण करणं उचित वाटत नाही,' अशी भूमिका पांडुरंग सकपाळ यांनी सुरुवातीला घेतली होती.
भाजपने साधला निशाणा
'शिवसेना ही ओवीसींपेक्षा सेक्युलर बनन्याचा प्रयत्न करत आहे, तर आगामी काळात शिवसेना खांद्यावरील भगवा सोडून हिरवा झेंडा हातात घेईल, बाळासाहेबांचे हिंदुत्व यांनी कधीच संपवले आहे. आगामी दसरा मेळाव्याला जय भवानी जय शिवाजी ऐवजी नवीन नारे दिले जातील,' असं भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.