Home /News /mumbai /

शिवसेनेला मोठा झटका, नरेश म्हस्केंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

शिवसेनेला मोठा झटका, नरेश म्हस्केंचा ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

ठाण्यातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

    मुंबई, 25 जून : ठाण्यातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नरेश म्हस्के हे ठाण्यातील मोठं नाव आहे. म्हस्के हे सेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आहेत. ठाणे महापालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील कार्यकर्त्यांची नाराजी यातून स्पष्ट दिसून येत आहे. ठाण्यातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते हे आज बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत हे यातून दिसून येत आहे. पण या सर्वांनी आपण शिवसेना सोडलेली नाही, असं स्पष्टपणे सांगितलं देखील आहे. नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले? "भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा..जात, गोत्र अन् धर्म अमुचा... शिवसेना, शिवसेना, शिवसेना...! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र!", असं नरेश म्हस्के ट्विटरवर म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या राजीनाम्यातदखील हेच म्हटलं आहे. म्हस्के यांच्या राजीनाम्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आज ठाण्यात (Thane) मोठं शक्ती प्रदर्शन केलं. या शक्ती प्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते जमले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भाषण केलं. श्रीकांत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला. अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. विशेषत: राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेच्या आमदारांना जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला. यावेळी नरेश म्हस्केंनी देखील शिवसैनिकांना इशारा दिला होता. (एकनाथ शिंदे यांची केंद्रीय मंत्री अमित शाहंशी फोनवर चर्चा; शिंदेंनी केली 'ही' मागणी) 'आमच्या नादी लागाल तर भारी पडेल', नरेश म्हस्केंचा इशारा "आमच्या नादी लागाल तर भारी पडेल. आतापर्यंत आम्ही संयम राखलेला आहे. ठाण्यात आज कोणत्याही पद्धतीत कोणाही विरोधात प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण आमच्यावर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आहेत. या नेत्यांच्या भांडणात आपल्याला भडकावलं जाईल. भरडले जाऊ नका. तुम्ही सर्वजण आपल्या नेत्याच्या विरोधात एकही चुकीची घोषणा करु नका. सर्व नेते आपले आहेत. आपण त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत", असं भाषण नरेश म्हस्के यांनी केलं. गुवाहाटीतल्या आमदारांचा मुक्काम वाढला दुसरीकडे गुवाहाटीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या आमदारांच्या खोल्यांचे बुकिंग 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आलं आहे. कायदेशीर लढाई, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास ठराव, भाजपसोबत चर्चा याला वेळ लागणार असल्याने बंडखोर आमदार गुवाहाटीमध्येच थांबणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या