मीरा भाईंदर, 04 जानेवारी : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment)स्थापन केले. स्थानिक पातळीवर सुद्धा तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. पण भिवंडीपाठोपाठ मीरा भाईंदरमध्ये (mira bhayandar) फोडोफोडीचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते उपशाखाप्रमुख मेंनेंजीस सातन यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
मीरा भाईंदर परिसरातील काशीमिरा भागात मेंनेंजीस सातन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत उपशाखाप्रमुख म्हणून काम पाहिले होते.पण अचानक सातन यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यानंतर सातन यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
'शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विश्वासावर आपण शिवसेनेत प्रवेश केला होता. पण महापालिकेतील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या कामाकडे दुर्लक्ष केले. सेनेत राहून जनतेची काम होत नव्हती, त्यामुळे पुन्हा स्वगृही परण्याचा निर्णय घेतला', असं यावेळी सातन म्हणाले.
विशेष म्हणजे, मागील महिन्यात 23 डिसेंबर रोजी भिवंडीमध्ये काँग्रेसला (Congress) धक्का बसला. काँग्रेसमधील 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होतामुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाला सोहळा पार पडला.
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. याच वादातून आता काँग्रेसचे 18 नगरसेवक हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले. भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. या सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने नोटीस दिली होती. पण या नगरसेवकांनी काँग्रेसलाच हात दाखवत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.