मुंबई, 17 नोव्हेंबर : कधी इतर क्षेत्रातील स्वप्नांचा पाठलाग करताना तर कधी परिस्थितीतून आलेल्या आव्हानांचा सामना करताना शिक्षण पूर्ण करणं शक्य होत नाही. मात्र शिक्षण घेण्यालाही वयाची मर्यादा नाही. इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण करता येतं. याचंच उदाहरण शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी घालून दिलं आहे.
एकनाथ शिंदे हे 77.25 टक्के गुण मिळवत पदवी परीक्षेत पास झाले आहेत. बीए परिक्षेचा निकाल आज लागला, ज्यात ते पास झाले आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिंदे यांनी ही पदवी मिळवली आहे.
'लोकांना मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाले, पण माझे शिक्षण अर्धवट राहिले होते. एक जिद्द आणि तळमळ होती शिकायची. जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करत पदवी प्राप्त केली, अशी प्रतिक्रिया पदवी परीक्षेत पास झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क इथं आले असता शिंदे बोलत होते.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाबाबतही भाष्य केलं आहे. 'महाराष्ट्रात मराठी माणसाला आणि देशात हिंदुंना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी दिली. सामान्य लोकांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या, हे केवळ बाळासाहेबांमुळेच होऊ शकते. कुंचला आणि वाणीच्या जोरावर पक्ष उभा करणं, ही जगातील एकमेव घटना आहे. त्यांच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. बाळासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक भव्य दिव्य असेल. यात कुठेही कमी पडणार नाही. स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री आणखी काही सूचना घेत आहेत,' अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.