Home /News /mumbai /

एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीहून शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण... निष्ठावान शिवसैनिक हरपला

एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीहून शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण... निष्ठावान शिवसैनिक हरपला

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचे डोंबिवलीतील खंदे समर्थक आणि कट्टर शिवसैनिकाचं आज निधन झालं आहे.

    डोंबिवली, 24 जून : महाविकास आघाडी सरकार सध्या संकटात सापडलं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी ही त्यांची राजकीय रणनीतीचा भाग आहे. एकनाथ शिंदे या घडामोडींमध्ये प्रचंड व्यग्र आहे. पण तसं असताना त्यांचं मन डोंबिवलीकडेदेखील होतं. कारण डोंबिवलीत त्यांचे जवळचे कार्यकर्ते आणि खंदे समर्थक अशी ओळख असलेले कट्टर शिवसैनिक राम मिराशी आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. शिंदे यांनी मिराशी बरे व्हावेत यासाठी सुरत आणि गुवाहाटी येथूनही शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना प्रत्यक्ष फोन करुन मिराशी यांना लवकर बरे करण्याची विनंती केली. पण अनपेक्षित घटना आज घडलीच. मिराशी यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे डोंबिवलीत शोकाकूल वातावरण आहे. राम मिराशी हे शिवसेनेचे डोंबिवलीचे उपशहरप्रमुख होते. त्यांचं आज सकाळी डोंबिवलीच्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 51 वर्षांचे होते. राम मिराशी यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यांना 21 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता. त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीने प्रयत्न सुरु होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वत: फोन करुन रुग्णालयातील डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण तरीही आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मिराशी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिराशी यांच्या निधनानंतर डोंबिवलीत शिवसैनिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ('कॅन्सरशी लढत होते मी, पण...' भावुक होत गुवाहाटीतून सेना आमदारानं मांडली घुसमट) राम मिराशी यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी स्वत: मिराशे यांच्या तब्येची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी बातचित करुन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी रुग्णालयाला भेट दिली होती. काही कार्यकर्त्यांनी मिराशी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण मिराशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटता आलं नाही. मिराशी यांच्या निधनाची बातमी आज शहरात पसरल्यानंतर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. मिराशी यांच्या पार्थिवावर डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या