मुख्यमंत्री कोण? मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही झाळकले शिवसेनेचे 'हे' पोस्टर

मुख्यमंत्री कोण? मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही झाळकले शिवसेनेचे 'हे' पोस्टर

मुंबईत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे 'मुख्यमंत्री' म्हणून पोस्टरबाजी केली होती.

  • Share this:

अजित मांढरे,(प्रतिनिधी)

ठाणे, 3 नोव्हेंबर: मुंबईत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे 'मुख्यमंत्री' म्हणून पोस्टरबाजी केली होती. मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही शिवसेनेकडून पोस्टरबाजी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही.

निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालला आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, अशी इच्छा मुंबई मराठी वाहतूक व्यापार सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दरम्यान, ठाण्यातील कोलबाड  परिसरात एकनाथ शिंदे यांचे फलक लागले आहेत.आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्या वाघ एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना, असे भले मोठे पोस्टर ठाण्यात ठिकठिकाणी झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या 'धणुष्यबाणा'समोर भाजपचे 'कमळ' झुकणार?

सत्तास्थापनेबाबत शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपने सुरुवातीच्या प्रस्तावात घातलेल्या अटी शर्तींमध्ये फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र आता या चार खात्यांपैकी दोन खात्यांवर पाणी सोडायचं का असा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झाला आहे.

गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने महसूल आणि वित्त सेनेला देऊ करून त्यांची नाराजी दूर करता येईल का याबाबत भाजपच्या गोटात खलबतं सुरू आहेत. याशिवाय केंद्रात शिवसेनेला एक केंद्रीय आणि राज्यमंत्रिपद देण्यावरही चर्चा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवण्याबाबत भाजप अजूनही ठाम आहे.

चर्चेतून कोंडी फुटणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही आज ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज रात्री दौऱ्याहून मुंबईत परतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय पुराणिक आणि व्ही सतीश यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदावरून अडून बसलेल्या शिवसेनेला 'टॉकिंग टर्म्स' वर आणण्यासाठी काय पर्याय आहेत यावर चर्चा केली जाणार आहे.

'मला नुकताच संजय राऊतांचा मेसेज आला''मला नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा संदेश आला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असल्याने मी त्यावर उत्तर दिलं नव्हतं. त्यांना मला का संदेश पाठवला याबाबत मला माहीत नाही. मात्र आता मी फोन करून त्यांच्याशी बोलणार आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'जय महाराष्ट्र, मी संजय राऊत,' अशा आशयाचा मेसेज अजित पवार यांनी भर पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. त्यामुळे भाजपसोबत तणावाचे संबंध निर्माण झालेली शिवसेना राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे का, या चर्चांनी आता आणखीनच वेग पकडला आहे.

संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 05:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading