Home /News /mumbai /

सर्वात मोठी बातमी! शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सरकार स्थापनेच्या हालाचालींना जोरदार सुरुवात

सर्वात मोठी बातमी! शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सरकार स्थापनेच्या हालाचालींना जोरदार सुरुवात

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना जोरदार सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 23 जून : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना जोरदार सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना शिंदे गटाकडून पत्र प्राप्त झालं आहे. या पत्रात शिंदे गटातील सर्व आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांचा संपर्क करुन शिंदे गटाकडून सर्व प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांना जवळपास 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा काढल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाने पाठिंबा काढण्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून पाठिंबा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं विधान केलं आहे. (राजकीय भूकंपाचा भाजप आहे का सूत्रधार? मेघालयचे मुख्यमंत्री बंडखोर आमदारांच्या भेटीला, खलबतांना वेग) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज झाले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षच हायजॅक केल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनेच्या सर्वाधिक आमदार आणि खासदारांचा शिंदेंना पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेत फुट पडल्याचं चित्र आहे. या दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं. संजय राऊतांनी बंडखोरांना परत येण्याचं आवाहन करत असताना शिवसेना सरकारमधून बाहेर पडायला तयार असल्याचं विधान केलं. संजय राऊत यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीवर चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसदेखील सरकारमधून पाठिंबा काढण्याबाबत चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिल आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या