Home /News /mumbai /

'राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली', एकनाथ शिंदे गटाची पहिली पत्रकार परिषद

'राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली', एकनाथ शिंदे गटाची पहिली पत्रकार परिषद

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज अधिकृत पत्रकार परिषद झाली. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी या पत्रकार परिषदेत शिंदे गटाची भूमिका मांडली.

    मुंबई, 25 जून : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी काल महाअधिवक्तांसोबत चर्चा करुन बंडखोर आमदारांना (Shiv Sena Rebel MLAs) अपात्र ठरविण्याबाबत नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आमदारांना नोटीस जारी करण्यात येत आहे. या नोटीसनुसार दोन दिवसांत आमदारांना आपली भूमिका मांडण्यासाठी विधान भवनात (Vidhan Bhawan) दाखल व्हावं लागणार आहे. आमदारांना सोमवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पण नरहरी झिरवळ यांच्या या निर्णयाला शिंदे गट कोर्टात आव्हान देणार आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाची आज अधिकृत पत्रकार परिषद झाली. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या पत्रकार परिषदेत शिंदे गटाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेला हायजॅके केलेलं नाही. तर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाने शिवसेनेला हायजॅक केलं, अशी भूमिका मांडली. दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले? "आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत. आम्ही कुणाच्याही दबावाखाली बंड पुकारलेलं नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या गटाचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य आहेत", असं दीपक केसरकर म्हणाले. "आम्ही महाराष्ट्रातून निघाल्यानंतर कमीवेळा बोलण्याची संधी मिळाली. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी मला प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्याची सूचना केली आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालाय की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत. पण आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. आम्ही सर्वजण शिवसेनेचे सदस्य आहोत. पक्षाच्या आमदारांच्या मताप्रमाणे निर्णय होणे अपेक्षित असतं. त्यांचे काही अधिकार आणि निर्णय असतात. आपल्या राज्यामध्ये विविध कामे करावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. तसेच सरकार चांगलं चालावं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना अनेकदा सूचवलं होतं. युतीमध्ये आपण लढलो, त्यांच्याचबरोबर राहू या, असा निर्णय सर्व आमदारानी घेतलेला होता", असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. (आता माफी नाही! शिवसेनेनं बजावला एकनाथ शिंदेंना समन्स) "कित्येक दिवस आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. ते पुढे सुद्धा आमचं ऐकतील, अशी आमची भावना आहे. एवढं सर्व सांगत आहेत तर त्याला काहीतरी कारण असेल. आम्हाला कुणीही सांगितलेलं नाही. आम्ही स्वत:हून निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदे आम्हाला नेते म्हणून उद्धव ठाकरे यांनीच दिले आहेत. शिंदेंच्या संपर्कात सर्व आमदार होते. सर्वांनी मिळून ठरवले. जे तृतीयांश बहमुताचा विषय हा संविधानिक आहे", असं केसरकर म्हणाले. "आमची संख्या 55 झाली आहे. 55 आमदारांचा नेता बदलवायचा असेल तर तो 16 लोकं एकत्र येऊन बदलवू शकत नाहीत. त्यामुळे जो काही निर्णय विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिलेला आहे त्या निर्णयाला आम्ही कोर्टात आव्हान देऊ. आमच्याकडे दोन तृतीयांश संख्या आहे. त्यामुळे कायद्यानुसार आम्हाला आमचा नेता निवडण्याचा अधिकार आहे", असं केसरकर म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या