दिल्लीची 'हवा' बिघडली.. शिवसेनेकडून भाजपची तुलना थेट 'हिटलर'शी

दिल्लीची 'हवा' बिघडली.. शिवसेनेकडून भाजपची तुलना थेट 'हिटलर'शी

पाच वर्षे सामान्यांना धमकावत शासन करणाली टोळी आज खुद्द भयभीत झाल्याचे दिसत आहे.

  • Share this:

मुंबई,10 नोव्हेंबर : शिवसेनाचे मुखपत्र 'सामना'च्या 'रोखठोक'मधून भारतीय जनता पक्षाची तुलना थेठ हिटलरशी केली आहे. पाच वर्षे सामान्यांना धमकावत शासन करणाली टोळी आज खुद्द भयभीत झाल्याचे दिसत आहे. धमकावल्यानंतरही मार्ग सापडत नाही अथवा समर्थन मिळवता येत नाही. असे होते तेव्हा एका गोष्टीचा स्वीकार करायला हवा, ती म्हणजे आता 'हिटलर'चे भूतही मेले आहे. त्याच्या मृत्यूसोबत गुलामीचे काळे ढगही हटले आहेत. पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी भविष्यात निर्भीड होऊन कार्य करण्याची गरज आहे. या परिणामाचा हाच अर्थ आहे, असे 'सुख कशात आहे? आता हिटलरचे भूतही मेले!' या शीर्षकाखाली शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

दिल्लीची हवा बिघडली म्हणून महाराष्ट्राची हवा बिघडू नये. दिल्लीत पोलीसच रस्त्यावर उतरले व त्यांनी कायदाच झुगारला. ही अराजकाची ठिणगी आहे. महाराष्ट्रात राजकीय अराजक निर्माण करू पाहणाऱयांसाठी हा धडा. महाराष्ट्राचे निर्णय महाराष्ट्रातच होण्याच्या दिशेने आपण सगळे निघालो आहोत.

काय आहे 'रोखठोक'

देशाला एक कणखर गृहमंत्री मिळाले आहेत तरीही राजधानी दिल्लीत पोलिसांनी बंड केले. पोलीस व त्यांचे कुटुंब रस्त्यावर उतरले. पोलिसांनीच न्यायासाठी मोर्चे काढले. त्यामुळे दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था साफ ढासळली व अराजकासारखी स्थिती निर्माण झाली. वकील व पोलिसांत आधी हिंसाचार झाला. या सर्व प्रकरणात पोलिसांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांचे आदेश मानले नाहीत व वकिलांनी उच्च न्यायालयाचे आदेश मानले नाहीत. दिल्लीत, देशाच्या राजधानीत 72 तास कायदा नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती हे चित्र बरे नाही. हे सर्व कसे घडले? देशाचे गृहमंत्रालय दिल्लीत. दिल्ली आजही केंद्रशासित प्रदेश. त्यामुळे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच आहे. महाराष्ट्रात बाबासाहेब भोसले असताना असे पोलिसांचे बंड झाले होते. पोलीस हातात बंदुका घेऊन रस्त्यावर उतरले. राज्य वेठीस धरले. दिल्लीचेही वातावरण पोलीस बंडामुळे असेच झाले.

नैतिकता कसली?

नैतिकतेच्या गप्पा सध्या कोण मारत आहेत? रोज व्यभिचारी वागणारे दुसऱ्यांना नैतिकतेचे धडे देतात तेव्हा आश्चर्य वाटते. जनतेचे मेंदू अधू झाले आहेत, असा त्यांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे हवे ते निर्णय त्यांच्यावर लादायचे हे जणू ठरूनच गेले आहे. जेव्हा सम्राट सेव्हेरस हा मरणपंथाला लागला तेव्हा त्याने अखेरचे उद्गार काढले, ‘‘आम्हाला काम पाहिजे.’’ आज देशातील बहुसंख्य कष्टकऱयांच्या हाताला काम नाही. शेती करून जगणारेही बेरोजगार झाले.

कारण राज्यकर्त्यांच्या मनातूनच काम करण्याची व राबण्याची भावना नष्ट झाली. सततचे राजकारण व कारस्थाने म्हणजे कामच हे जणू ठरले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे का व्हावे? शिवरायांच्या राज्यातही सैनिक मोहिमांवर जात व मोहिमा नसतील तेव्हा ते घर चालविण्यासाठी शेती करीत असत. रोमन साम्राज्याचा विस्तारही सततच्या परिश्रमाने झाला. त्या श्रमामुळेच रोमन सेनापतींची सत्ता टिकली. इटली देशात जुन्या काळात शेतकरी व अधिकारी वर्ग हे समाजात समान पातळीवर असत. याबाबत प्लिनी या लेखकाने चांगले लिहून ठेवले आहे. ‘‘विजय मिळवून आलेले सेनापती आणि सैन्यातील अधिकारी युद्धातून परत आल्यावर आनंदाने शेते नांगरण्यास जात असत. जमिनी नांगरण्यात त्यांना भूषण वाटे. पुढे प्रत्येक धंद्यात गुलामांना काम करावयास लावण्याची पद्धत पडली. तेव्हा कष्ट करणे हे गुलामांचे काम असून त्यात कमीपणा आहे अशी लोकांची समजूत झाली आणि राज्यकारभार चालविणाऱया लोकांत जेव्हा आळस व चैनबाजी शिरली तेव्हा रोमन साम्राज्य आपले अखेरचे दिवस मोजू लागले.’’

इकडेही रोमन साम्राज्य

महाराष्ट्रात रोमन साम्राज्यासारखी परिस्थिती मधल्या काळात निर्माण झाली हे सत्य कुणीही नाकारणार नाही. ‘मी राजा, बाकी सारे गुलाम.’ मग अशावेळी ज्यांनी राज्य वाढवले ते जिवाभावाचे साथीही दुष्मन ठरवून अडगळीत टाकले जातात. हे सगळे राजकारण एकदाचे संपवा या मानसिकतेत सध्याचा महाराष्ट्र आहे. यक्षाने युधिष्ठराला जे अनेक प्रश्न विचारले आहेत त्यात ‘‘उत्तम सुख म्हणजे काय?’’ असा एक प्रश्न विचारलेला आहे आणि मोठय़ा सावधपणे युधिष्ठराने यक्षाच्या प्रश्नाला जे उत्तर दिले आहे त्यात सुखाची उत्कृष्ट व्याख्या सामावलेली दिसते. युधिष्ठर म्हणतो, ‘‘संतोषात सारे सुख आहे!’’सुखाची व्याख्या संतोषात आहे. राजकारणातला विवेक आणि संतोष संपल्याने आजची वखवख निर्माण झाली आहे.

हवा बिघडली

दिल्लीची हवा बिघडली म्हणून महाराष्ट्रास खोकला होऊ नये. महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्रातच व्हावे. महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम नाही. इकडले निर्णय इकडेच व्हावेत. निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱयाच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे आशीर्वाद दिले, पण पंधरा दिवसांनंतरही श्री. फडणवीस शपथ घेऊ शकले नाहीत. कारण अमित शहा राज्यातील घडामोडींपासून अलिप्त राहिले आहेत. ‘युती’तला सगळय़ात मोठा पक्ष शिवसेना मावळत्या मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार नाही हा सगळय़ात मोठा पराभव. त्यामुळे दिल्लीचे आशीर्वाद लाभूनही घोडय़ावर बसता आले नाही. चित्र असे आहे की, यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे उद्धव ठाकरे ठरवतील. राज्याचे मोठे नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरेल व राज्यातील काँग्रेसचे अनेक आमदार सोनिया गांधींना भेटून आले. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रावर सोपवा असे त्यांनीही सोनियांना सांगितले. काही झाले तरी पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री नको हा महाराष्ट्राचा एकमुखी सूर आहे. कारण सूडाचे, पाय खेचण्याचे व गुलामीचे राजकारण सगळय़ांनाच संपवायचे आहे. पाच वर्षे इतरांना भीती दाखवून राज्य करणारी मंडळी आज स्वतःच दहशतीखाली आहेत. हे उलटे आक्रमण झाले आहे. भीती दाखवूनही मार्ग सापडत नाही व पाठिंबा मिळत नाही असे जेव्हा घडते तेव्हा एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, हिटलर मेला आहे व गुलामीचे सावट दूर झाले आहे. पोलीस व इतर तपास यंत्रणांनी यापुढे तरी निर्भयपणे काम करावे! या निकालाचा हाच अर्थ आहे!

Published by: Sandip Parolekar
First published: November 10, 2019, 9:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading