30 वर्षांचं ओझं उतरवलं.. भाजपने आता कितीही प्रयत्न केले तरी परतीचे दरवाजे कायमचे बंद!

30 वर्षांचं ओझं उतरवलं.. भाजपने आता कितीही प्रयत्न केले तरी परतीचे दरवाजे कायमचे बंद!

'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्यांंच्या शक्यताना आता पूर्ण विराम दिल्याचे ठणकावून सांगत भाजपवर बोचरी टीका

  • Share this:

मुंबई,21 डिसेंबर: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून शनिवारी पुन्हा एकदा भाजपवर खरमरीत टीका करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपची युती आता कायमची तुटल्याचीही स्पष्ट करण्यात आले आहे. युती आता कायमची संपली असून भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आता परतीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतच गेली 30 वर्षे खांद्यावरचे ओझे फेकून दिल्याची घोषणा केली. त्यामुळे 'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्यांंच्या शक्यताना आता पूर्ण विराम दिल्याचे ठणकावून सांगत भाजपवर बोचरी टीकाही करण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. सहाव्या दिवशी हे अधिवेशन संपणार आहे. दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षांतर्फे विदर्भाविषयीचा प्रस्ताव मांडणार आहेत. तर विरोधी पक्षातर्फे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही पुन्हा आमनेसामने येणार आहेत. तसंच आज सरकारतर्फे जीएसटी सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे.

'2019 मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. शिवसेनेने स्पष्टच केले. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले. ओझे उतरले!'

'भारतीय जनता पक्षाचे 30 वर्षांचे ओझे उतरवले असल्याची शुभवार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! हा प्रयोग गेली 30 वर्षे चालला होता. आता हे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने खिडकीत बसून ‘शुक शुक’ करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे. नागपूरच्या अधिवेशनात काही मंडळींनी टोकाची वक्तव्ये केली. ‘आम्ही फार काळ विरोधी पक्षात बसणार नाही. पुढच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा सत्तेवर असू’ अशी फेक विधाने करूनही नागपूरच्या थंडीत राजकीय हवा गरम झाली नाही. भाजपचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2019 08:43 AM IST

ताज्या बातम्या