कोंडी फोडण्यासाठी भाजप-शिवसेना आज पहिल्यांदाच बसणार आमनेसामने?

कोंडी फोडण्यासाठी भाजप-शिवसेना आज पहिल्यांदाच बसणार आमनेसामने?

लोकसभा निवडणुकीच्यावेळी युती करताना नेमकं काय ठरलं होतं याची चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भेटावं असा भाजपचा प्रस्ताव आहे.

  • Share this:

प्रफुल साळुंखे, मुंबई 2 नोव्हेंबर : भाजप-शिवसेनेमध्ये सत्तावाटपासाठी निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. रात्री ही बैठक होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय. त्याबाबतचा एक प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिलाय. निकालानंतर गेल्या आठ दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये कोंडी निर्माण झालीय. महायुतीला बहुमत मिळूनही सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळावा यासाठी शिवसेना दबावाचा प्रयत्न करतंय. तर भाजप मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान युती करताना जे ठरलं होतं त्यानुसारच सत्तावाटप व्हावं अशी शिवसेनेची मागणी आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्यावेळी युती करताना नेमकं काय ठरलं होतं याची चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी भेटावं असा भाजपचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय. कुठल्याही परिस्थितीत अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे अशी शिवसेनेची मागणी आहे तर पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजपचा जोर आहे.

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक, घडामोडींना वेग

त्या बदल्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि काही जास्तीची खाती देण्याची तयारी भाजपने दाखवलीय. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळेही तणाव निर्माण झाला असून ही कोंडी फोडणार तरी कशी असा प्रश्न निर्माण झालाय.

उद्धव ठाकरे करणार मराठवाड्याचा दौरा

विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपसोबत सुरू असलेला शिवसेनेचा सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. सत्तास्थापनेबाबत दोन्ही पक्षांमध्ये अजूनही चर्चेला सुरुवात झालेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने भाजपवर टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

VIDEO:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 कोंटींची तरतूद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना भेटून शेती नुकसानीचा आढावा घेणार आहेत. शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे हे आज उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे सत्तेची कोंडी फुटत नसताना उद्धव ठाकरे मात्र मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याने हा पेच कसा सोडवला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2019 03:28 PM IST

ताज्या बातम्या