कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप युती तुटली, मनसेलाही बसला फटका!

कल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप युती तुटली, मनसेलाही बसला फटका!

आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आजच्या महासभेमध्येही शिवसेना- भाजपमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली

  • Share this:

कल्याण, 11 फेब्रुवारी : राज्यात सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर वाद निर्माण झाला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेतही अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला होता. अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. याचा फटका मनसेलाही बसला आहे.

आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आजच्या महासभेमध्येही शिवसेना- भाजपमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली. भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी अनधिकृत बांधकाम आणि प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सभा तहकुबी दाखल केली होती. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर पालिकेतील सेना-भाजपची युती तुटली. कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद भाजपकडे गेले असून युती तुटल्याने मनसेला सुद्धा याचा फटका बसला असून विरोधी पक्ष नेतेपद गमवावं लागलं. मनसेचा आक्षेप फेटाळून पिठासीन अधिकारी महापौर विनीता राणे यांनी राहुल दामले यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा केली, तर भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांची भाजप गटनेतेपदाची घोषणा केली.

केडीएमसीची महासभा वादळी

कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेची सुरुवातही अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. भाजपच्या उपेक्षा भोईर यांनी प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांच्यावर प्रशासनाने कारवाई करण्याची आग्रही मागणी केली. परंतु, त्यावरूनच भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांविरोधातील जंगी कलगीतुरा सुरू झाला. एकीकडे भाजप सदस्य आणि दुसरीकडे शिवसेना सदस्य अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सभागृहात झडत होत्या. तर याप्रकरणी त्यादरम्यान महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दोन वेळा निवेदनही केलं. ज्यावर उपेक्षा भोईर यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तर त्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर विनिता राणे यांनी याप्रकरणी दिलेल्या निर्देशांवर भाजपने आक्षेप घेत महासभेतून सभागत्याग केला. यावेळी भाजपने शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दुसरीकडे याच महासभेत सेना-भाजप युती तुटल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारावरून सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे भाजप नगरसेवकांवर सडकून टीका केली आहे.

अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध कारवाई होत नसल्याने केडीएमसीमधील भाजपचे नगरसेवक निवडणुकीच्या तोंडावर जागे झाले आहेत. सत्तेची मलाई 20 वर्षाहून अधिक काळ मिळून खाल्ली. आता ही स्थायी समिती सभापती पद स्वतः कडेच ठेवलं. दाखवायला उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याच प्रभागात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेला एका नगरसेवकाच्या ऑफिसच्या बाजूच्या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली होती ती पुन्हा बांधून तयार झाली आहे, असा आरोप  सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी केला.

First published: February 11, 2020, 6:16 PM IST

ताज्या बातम्या