मुंबई, 12 सप्टेंबर : मुंबईत कांदिवलीमधील माजी नौदल अधिकाऱ्याला काही शिवसैनिकांनी मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगात्मक कार्टून त्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी ही मारहाण करण्यात आली होती. या संदर्भात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 6 शिवसैनिकांना अटकही करण्यात आली, तसंच नंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र या प्रकरणावर शिवसेनेनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेनेची भूमिका मांडली आहे.
माजी नौदल अधीकाऱ्यावर शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा संतप्त आणि उत्स्फूर्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांना तात्काळ अटकही करण्यात आली. विरोधी पक्षाने या घटनेचं राजकीय भांडवल करावे हे दुर्देवी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच संयम दोन्ही बाजूने पाळला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्राच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांचा संयमाचा बांध तुटतो. म्हणून सर्वांनी जबाबदारी वागलं पाहिजे नाहीतर समाजात तणाव निर्माण होऊ शकतो, अशी शिवसेनेची भूमिका आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
नेमकं काय झालं होतं?
कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेलं व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. शिवसेनेचे 2 शाखा प्रमुख आणि 7-8 शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता.
या हल्ल्याचा आपण निषेध करत असून अशा गुंडागर्दीमुळे महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता आपला आवाज गप्प करणार नाही असंही भातखळकर यांनी म्हटलं होतं.