मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शर्जिलला बेड्या पडतीलच! पण हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या, सेनेचा भाजपला टोला

शर्जिलला बेड्या पडतीलच! पण हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या, सेनेचा भाजपला टोला

'कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही'

'कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही'

'कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 04 फेब्रुवारी : 'शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात (Maharashtra) हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे' अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) एल्गार परिषदेबद्दल (Elgar Parishad) नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, 'शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले' असा टोलाही भाजपला (BJP) लगावला.

एल्गार परिषदेतील शर्जिल उस्मानीच्या भाषणावरून राज्यात भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सेनेनं आपली भूमिका मांडत विरोधकांना चार खडेबोल सुनावले आहे.

'कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या. तो कोणीएक शर्जिल उस्मानी तेथे आला व त्याने आपल्या देशातले हिंदुत्व कसे सडले आहे यावर प्रवचन झोडले. त्यावर भाजपने आता आरोळ्या ठोकायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वासाठी रस्त्यावर येऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. उस्मानी जे बरळला ते गंभीर आहे' असं मत सेनेनं व्यक्त केले आहे.

'हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा आतडी पिळवटून टाकणारा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांचे म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केलीत. शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी 90 दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱ्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा. रस्त्यावरचा शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळय़ांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय? असा सवालच सेनेनं देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

'हा जो कोणी शर्जिल हिंदुत्वावर शिंतोडे उडवून गेला त्यास पुण्यात आमंत्रित करणाऱ्यांवर सर्वप्रथम कठोर कारवाई केली पाहिजे. एल्गार परिषदेच्या निमित्ताने शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीचे लोक पुण्यात बोलवायचे व वातावरण बिघडवायचे, हीच त्यांची दुकानदारी आहे. शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीच्या बोकडांनी शिंतोडे उडवले म्हणून हिंदुत्वाचे तेज कमी होणार नाही, पण म्हातारी मेल्याचे दुःख नसून काळ सोकावत जातो. महाराष्ट्रात शिवसेना आहेच. सरकारचे सूत्रधार ठाकरे आहेत. त्यामुळे कायदा आहे तसा हाती दंडुकाही आहेच. म्हणूनच हिंदुत्वावर वाकडेतिकडे हल्ले कोणीच सहन करणार नाही. पण सवाल हा आहे की, या शर्जिलसारख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगम होतो कोठून?' असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला आहे.

'हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत आहे व तेथून तयार झालेला माल देशभरात जात असतो. हिंदुत्व विरोधकांच्या मुसक्या महाराष्ट्र आवळेलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे. त्या पळून गेलेल्या व लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी त्यांची आहे व याकामी कोणी हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना, ही शंका म्हणूनच आहे' असा टोलाही सेनेनं योगी सरकारला लगावला.

First published:

Tags: Shivsena