मुंबई, 03 डिसेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही 'त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे' असं परखड मत व्यक्त केले आहे.
शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार, राज्यातील राजकारणावर परखड भाष्य केले.
यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल सवाल केला असता शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले. 'कोणत्याही पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षात आणि लोकांमध्ये किती असते, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे' असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला तयार आहे का? असा सवाल केला असता शरद पवार म्हणाले की, 'त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहे. राहुल गांधी यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे' असं मत व्यक्त केले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. राहुल हे चिंताग्रस्त आणि स्वत:बाबत अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. तसंच त्यांची तुलना एका विद्यार्थ्याशी केली आहे, ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे जो शिक्षकांनाही प्रभावित करतो मात्र या विषयात प्राविण्य मिळवण्याची त्याच्याकडे योग्यता नाही आहे किंवा आवड नाही आहे' असं मत ओबामांनी नोंदवलं आहे.
शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, 'ओबामा यांनी त्यांची मतं पुस्तकात मांडली आहे. आपली मतं मांडण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांच्या मताशी आता सर्वांनीच सहमत असलं पाहिजे, असंही काही नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबद्दल आपण बोलू शकतो, पण देशाबाहेरील नेतृत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही.' असं मत त्यांनी व्यक्त केले.