मुंबई, 12 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेत 'शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहे' असं जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर मोदींनी अनेक सभेत याचा दाखलाही दिला. पण, पहिल्यांदाच शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचे वक्तव्य खोडून काढले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. पहिल्या भागानंतर आज दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपला टोला लगावला.
संजय राऊतांनी प्रश्न विचारला की 'आपण मोदींचे गुरू आहात असे ते म्हणतात. अशा वेळी आपण आपल्या शिष्याला हे सांगायला हवं की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतील?'
' मी त्यांचा गुरू आहे असे म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. गुरू वगैरे सोडा, राजकारणात कुणी कुणाचा गुरू वगैरे असत नाही. आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही.' असा टोला पवारांनी मोदींना लगावला.
महापालिकेचा गलथान कारभार, रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही ठेवलं कोरोनाग्रस्तांमध्ये
तसंच, 'या सगळय़ा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ इथे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. दुर्दैवाने काय झालं मला माहीत नाही, ते सोडून गेले. आता अशी जी माणसं आहेत, ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा डॉ. मनमोहन सिंगांसारखे लोक आहेत.' असंही पवार म्हणाले.
संजय राऊत - या देशाला एका मनमोहन सिंगांची गरज आहे का?
शरद पवार - हंड्रेड पर्सेंट गरज आहे. कारण मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर झाले तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहितीय की, त्या वेळेला फायनान्शियल क्रायसेसमधून कसे आम्ही जात होतो, पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं त्या मनमोहन सिंगांना मी श्रेय देतो तसं नरसिंह रावांनाही श्रेय देतो. या दोघांनी नेहमीच्या चौकटीचा रस्ता बदलून वेगळय़ा वळणावर गाडी नेली आणि सबंध अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या तज्ञ लोकांची मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायला हवीत. माझी खात्री आहे, अशा कोणत्याही प्रयत्नांना देश सहकार्य करेल.
संजय राऊत - देशातलं आणि महाराष्ट्रातलं, ते दूर करण्यात कुठे समन्वयाची तुम्हाला कमतरता दिसतेय का?
शरद पवार – मला असं दिसतंय की, पंतप्रधानांनी इतर पक्षांच्या काही जाणकार लोकांशी बोलण्याची गरज आहे. संकटाची व्याप्ती पाहता कुठल्या तरी एकाच पक्षाने हे सर्व आपणच सोडवून टाकू ही भूमिका घेऊन चालणार नाही. या वेळेला ज्यांची ज्यांची मदत होणं शक्य आहे, उपयुक्त आहे त्या सगळय़ांना बरोबर घेण्यासंबंधी प्रयत्न केला पाहिजे. आज मोदी साहेबांचा जो सेटअप आहे, त्या सेटअपमध्ये अनेक सहकारी असे आहेत की, या अशा प्रकारच्या कामाचा अनुभव त्यांना नाही. कोरोनाचं म्हणाल तर, आम्हालाही तसा अनुभव कुणालाही नाही. कारण असं संकट आपण कधी पाहिलेलंच नव्हतं, पण या संकटावर मात करण्यासाठी ज्या प्रकारची पावलं टाकायला सगळय़ांची साथ घेतली पाहिजे त्याची आम्हाला कमतरता दिसते. सर्वांना सोबत घेऊनच या संकटावर मात करता येऊ शकेल.'
संजय राऊत - तुम्ही देशाच्या अर्थमंत्र्यांशी या विषयावर कधी चर्चा केली?
शरद पवार – नाही. माझी कधी त्यांच्याशी भेटही झाली नाही. एकदाही भेट झाली नाही. भेट सोडाच, कधी बोलणंही झालेलं नाही. पण मला असं वाटतं की, इतका मोठा देश, मोठी लोकसंख्या म्हटल्यावर रोज समोर असे प्रश्न उभे राहतात, देशाची अर्थव्यवस्थाच जेव्हा संकटात सापडते त्या वेळेला एक प्रकारचा डायलॉग इतरांसोबत पाहिजे, तो डायलॉग मला सध्या दिसत नाही.
राजभवनावर कोरोनाचा कहर, 16 कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह ; राज्यपाल झाले क्वारंटाइन
संजय राउत -कोरोना असेल, लॉकडाऊन असेल, अर्थव्यवस्था असेल, हे संकट सुरू असताना देशावर अजून एक संकट आले ते म्हणजे चीनचा हल्ला. आपल्या सीमांवर अशांतता आहे. चीनचे सैनिक आतमध्ये घुसलेत अशा प्रकारचे आरोप होताहेत. तुम्ही या चीनच्या संकटाकडे या क्षणी कसं काय पाहता?
शरद पवार – माझा या सगळय़ा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण या देशात अनेक वर्षे आपला मित्र कोण, शत्रू कोण याचा ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी भारतीय मनात शत्रू म्हणून पहिल्यांदा पाकिस्तान येतं. पण माझं अनेक वर्षांपासून मत आहे, पाकिस्तानपासून खरी चिंता आपल्याला नाही. पाकिस्तान आपल्या विचारांचा नाही ही गोष्ट खरी. पाकिस्तान आपल्या हिताच्या विरोधात पावलं टाकतो हेही खरं, पण लाँग टर्मच्या दृष्टीने आपल्या सगळय़ांच्या हिताबाबत खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. चीन हे आपल्या देशाच्या दृष्टीने मोठं संकट आहे. चीनपासून आपल्याला होणारा उपद्रव हा साधासुधा नाही.
संजय राऊत - चीनच्या प्रश्नाचं राजकारण करू नये असे आपण म्हणालात. म्हणजे नक्की काय?
शरद पवार – मी काय म्हणालो? हा जो परवा संघर्ष झाला, त्यात निश्चितच चीनची भूमिका चुकीची होती. गलवानचे जे खोरे आहे, तो लडाखमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि लडाख आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लडाख हा भारतासाठी कधीही चिंता करण्यासारखा भाग नव्हता. तिथे जे लोक आहेत ते बुद्धांच्या विचारांचे, शांतताप्रिय आणि भारत व संपूर्ण भारतीयांबद्दल आस्था असणारे असे आहेत. आपलाच भाग आहे तो. याआधी तिथे कधी असा वाद रंगला नव्हता. शेजारी चीन आहे. 1993 साली जेव्हा मी चीनला गेलो होतो, त्या वेळेला आम्ही चीनशी करार केला. आम्ही तो ड्राफ्ट बनवला, जे मी मघाशीच सांगितलं, आमच्या तो चर्चेचा मसुदा.. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांनी स्वतः तिथे जाऊन तो मंजूर करून घेतला. मसुदा काय होता, तर तो असा होता की, लडाख आणि या सगळ्या परिसरामध्ये आपल्यामध्ये संघर्ष नको आणि उद्या एखाद-दुसऱया प्रश्नावरून मतभेद झाले तर त्या ठिकाणी दोन्ही देशांनी बुलेट वापरायची नाही. बंदुकीचा वापर करायचा नाही. तुम्ही बघितलंत, परवा त्या रस्त्यावरून वाद झाला, तेव्हा तिथे बंदूक वापरली नाही. हा त्या कराराचाच भाग होता.
वयाच्या 21 व्या वर्षी जज होऊन मयंकने रचला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात मिळालं यश
संजय राऊत - पण त्यावर उपाय काय? हे थांबेल असे वाटत नाही…
शरद पवार – माझं स्वच्छ मत असं आहे की, हा प्रश्न आहे तो आपण लष्करी शक्तीने सोडवू शकत नाही. हा प्रश्न आपल्याला डिप्लोमॅटिक स्टॅटेजीनेच सोडवला पाहिजे आणि त्यामुळे हे जे सांगितलं जातं सारखं की, सैन्य आहे.. सैन्य आणलंय.. सैन्य आपण वापरतोय. ठीक आहे, सैन्य आपल्याला नेता येईल. लष्करप्रमुख नरवणे आणि काही लोकांची स्टेटमेंट मी ऐकली.. ठीक आहे, वेळ आली तर ते आपण उत्तर द्यायचं ते देऊच. त्याची काय किंमत द्यायची असेल ती देऊ, पण आज त्या लष्करी शक्तीने हा प्रश्न सोडवण्याची परिस्थिती नाही. त्याचे उलटे परिणामही आपल्याला भोगावे लागतील.
संजय राऊत - आपल्या 20 जवानांची हत्याही चीनने आपल्या हद्दीत घुसून केली आहे. हा चिंतेचा विषय आहे…
शरद पवार – याबद्दल आपल्याला निश्चितच कडक भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती भूमिका आपण वेळच्या वेळीच घेण्याची आवश्यकता असते. ती या परिस्थितीत घ्यायला कदाचित विलंब लावला की काय, असं वाटतं. मी म्हणतो की, यात राजकारण आणू नका. त्याचं कारण एकच आहे की, हा प्रश्न इतका गंभीर आहे आणि उद्या आपण सांगितले की, फोर्स पाठवा.. हल्ले करा. करू शकतो, पण त्या हल्ल्याला जे उत्तर दिलं जाईल आणि त्याची किंमत जी संपूर्ण देशाला द्यावी लागेल तीसुद्धा दुर्लक्षित करू नये…आणि त्यामुळे हल्ल्याचा वेळप्रसंग आला तर विचार करता येईल, पण हल्ला करण्याच्या ऐवजी निगोशिएशनच्या माध्यमातून, डिप्लोमॅटिक चॅनलने जगातल्या अन्य देशांचे प्रेशर त्यांच्यावर आणून, युनायटेड नेशनसारख्या संस्थांचा दबाव आणून जर याच्यातून काही मार्ग निघत असेल तर तो प्रयत्न पहिल्यांदा करणं शहाणपणाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, PM narendra modi, Samana, Sanjay raut, Sharad pawar, Sharad pawar interview