महाराष्ट्रात शरद पवार Actioncमध्ये, रिमोट कंट्रोल गेला राष्ट्रवादीकडे?

महाराष्ट्रात शरद पवार Actioncमध्ये, रिमोट कंट्रोल गेला राष्ट्रवादीकडे?

संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही शरद पवारांचा आवर्जुन सल्ला घेत आहेत. त्यामुळे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम पवार करत आहेत असं बोललं जातं आहे.

  • Share this:

मुंबई 30 मे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालली. या भेटीत राज्यातल्या सद्यस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली जातेय. मात्र राज्यात कोरोनाने निर्माण झालेली गंभीर स्थिती आणि राजकीय परिस्थिती याचा अंदाज आल्याने अनुभवी शरद पवार हे राज्यात पुन्हा सक्रिय झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सत्तेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे गेला अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं सर्व कौशल्य आणि अनुभव पणाला लावत राज्यात अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली आणि शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आणलं. त्यामुळे शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे.

तर विचारलं तरच मी सल्ला देतो उगाच अनाहूतपणे सल्ला देत नाही असं पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र सध्या राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व स्थिती निर्माण झालीय. त्यात महाविकास आघाडीतही सर्वच काही आलबेल नाही हेही स्पष्ट झालंय. त्यामुळे शरद पवारांनी सूत्र पुन्हा एकदा आपल्या हातात घेतल्याचं बोललं जातंय.

आमदार रोहित पवारांच्या कुटुंबातही आहे कोरोना योद्धा, केला खास सत्कार

पहिल्यापासूनच महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. तर काँग्रेसला आपल्याला डावललं जातेय असं कायम वाटत असतं. त्यामुळे सक्रियता दाखवून राष्ट्रवादी सत्तेतलं आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असंही बोललं जातंय.

राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत असताना राज्यात काँग्रेसमध्ये मात्र बदलाची शक्यता व्यक्त केली जातेय. ठोस निर्णयाचे अधिकार राज्यात नाही तर दिल्लीत आहेत. त्यामुळे राज्यातले नेते प्रभावहिन असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्याचाच राजकीय फायदा घेत राज्यात राष्ट्रवादीची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न पवार करत असल्याचा अंदाज राजकीय निरिक्षक व्यक्त करत आहेत.

VIDEO: कोरोनाने हाहाकार असतानाच अमेरिकेतल्या 30 शहरांत भडकले दंगे

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असताना अजित पवारांनी भूकंप घडवला होता. शरद पवारांनी ते अतिशय कौशल्याने हाताळत बंड मोडून काढलं आणि अजित पवारांची घरवापसी केली. त्यामुळे शरद पवार  कुठलीही जोखीम घ्यायला आता तयार नाहीत.

अशा संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही शरद पवारांचा आवर्जुन सल्ला घेत आहेत. त्यामुळे एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम पवार करत आहेत असं बोललं जातं आहे.

 

 

First published: May 30, 2020, 11:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading