मुंबई, 30 मार्च : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण, ही शस्त्रक्रिया आजच करण्यात येणार आहे.
शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. परंतु, प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार यांना तातडीने आज संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या मोजक्याच नेत्यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवार यांच्या बुधवारी होणारी पित्ताशयाची शस्त्रक्रिया आजच रात्री केली जाणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. पवार यांना अचानक आज त्रास होत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.'
शरद पवार यांना Gallstone; नेमकी काय आहे ही समस्या?
शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत. त्यांच्यावर बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी दिली.
पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते.
कधी कधी पित्त इतकं घट्टं होतं की त्याचे खडे तयार होतात. हेल्थलाईनच्या माहितीनुसार पित्ताशयात खडे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे पित्तात कोलेस्टेरॉल म्हणजे चरबीचं प्रमाण जास्त होतं.
बहुतेक रुग्णांमध्ये पित्ताशयातील खड्यांची लक्षणे दिसत नाहीत. पण ओटीपोटात उजव्या बाजूला वर होणाऱ्या तीव्र वेदना, मळमळ, उलटी, गडद लघवी, पोटात दुखणं, ढेकर, डायरिया, अपचन ही याची लक्षणं आहेत.
पित्ताशयाचे खडे कोणत्याही वयात तयार होऊ शकतात. पण वाढत्या वयानुसार हे खडे होण्याची शक्यताही वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात.
चरबीयुक्त पदार्थ खाणं हे पित्ताशयातील खडे होण्याचं मुख्य कारण आहे. याशिवाय लठ्ठपणादेखील यासाठी कारणीभूत ठरतो. पोटाच्या ठिकाणी चरबी असल्यामुळे असल्यास पित्ताशयाचे खडे तयार होण्याचा धोका जास्त असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Sharad pawar