'मुलगा हवा असा हट्ट असताना तुम्हाला एकच मुलगी का?' शरद पवारांनी दिलं अभिमास्पद उत्तर, पाहा VIDEO

'मुलगा हवा असा हट्ट असताना तुम्हाला एकच मुलगी का?' शरद पवारांनी दिलं अभिमास्पद उत्तर, पाहा VIDEO

दूरदर्शनच्या एका मुलाखतीत शरद पवार यांना एकच मुलगी असण्यासंदर्भात विचारलं होतं, त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर फारच अभिमानास्पद आहे.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar 80th Birthday) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत असतानाच त्यांच्याबाबतच्या काही रंजक कथाही शेअर केल्या जात आहेत. शरद पवारांच्या एकुलत्या एक कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. दूरदर्शनच्या एका मुलाखतीत त्यांना एकच मुलगी असण्यासंदर्भात विचारलं होतं, त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर फारच अभिमानास्पद आहे.

शरद पवारांची ही मुलाखत तेव्हाची आहे, जेव्हा सुप्रिया सुळे राजकारणात सक्रीय नव्हत्या. यामध्ये त्यांनी असं देखील म्हटलं होतं सुप्रिया सुळेंना राजकारणात रस नाही आहे. सुप्रिया सुळेंसंबंधित एक प्रश्न पवारांना विचारण्यात आला होता. मुलगा हवाच असा हट्ट अनेकजणांचा असताना तुम्हाला एकच मुलगी कशी काय? हा प्रश्न तुम्हाला लोकं विचारत असतील. तुम्ही याचं समाधान कसं करता? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी फार कमाल उत्तर दिलं होतं. यावेळी शरद पवारांनी असं म्हटलं होतं की त्यांना गावागावांत गेल्यावर बऱ्याचदा या प्रश्नाला सामोरं जावं लागलं होतं. नाव चालवण्यासाठी  आणि बरं वाईट झालं तर अग्नी देण्यासाठी मुलगा हवा, तरंच स्वर्गाचा रस्ता खुला होतो असं त्यांना म्हटलं जात असल्याचं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

यावेळी शरद पवारांनी असं म्हटलं की, 'याकडे पाहायचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे. मला असं वाटतं अग्नी देण्यासाठी कोण असणार याची चिंता करायची की जिवंत असताना नीट नेटकं वागणाऱ्याची चिंता करायची,"

'मुलगा की मुलगी याकडे पाहण्याचा समाजाचा जो दृष्टीकोन आहे तो बदलण्याची गरज आहे. मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम प्रकारचं काम करुन घेऊ शकतो. व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची मला खात्री आहे', असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं होतं. शरद  पवारांच्या या मुलाखतीमध्ये त्यांनी स्त्री शक्तीबाबत विश्वास व्यक्त केला होता.

त्यांची मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये चमकेल असा विश्वास पवारांना होता. दरम्यान एकच मुलगी असण्यामागे त्यांनी आणखी एक कारण सांगितलं होतं. शरद पवार असं म्हणाले की, आम्ही सर्व देशाला-महाराष्ट्राला कुटुंब नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणार आणि आपल्या घरात गर्दी योग्य दिसत नाही. आपण जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत इतर जणही थांबण्याचा विचार करणार नाहीत. त्यामुळ मी आणि आमच्या पत्नीने एकाच मुलीवर समाधान मानण्याचं ठरवलं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर साथ देणाऱ्या शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी या निर्णयामध्ये देखील त्यांची साथ दिली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 12, 2020, 11:59 AM IST

ताज्या बातम्या