मुंबई 08 मार्च : वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अकोला पूर्वमधून ते विधानसभेवर निवडून आले होते. 26 फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर 45 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले होते. त्यावेळेसच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. या आधीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.
भदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत पक्ष सोडला होता. आंबेडकर हे सगळ्यांना सोबत घेऊन जात नाहीत, मनमानी करतात, विश्वासात घेत नाहीत, त्यांची कार्यशैली ही हुकूमशाही प्रवृत्तीची आहे असे आरोप केले होते. या आधीही त्यांच्यावर असेच आरोप झाले होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितने निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता.
आता महाराष्ट्रात सत्तेत आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे वंचितच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोहिम आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दलीत आणि मुस्लिम मतदार हा वंचितच्या बाजूने झुकला होता. वंचितचे उमदवार जिंकले नसले तरी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडतील एवढी मतं मिळवली होती.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मताच्या गडाला सुरुंग लावण्यासाठीच भाजपने आंबेडकरांचा वापर केला असेही आरोप झाले होते. मात्र ते सर्व आरोप प्रकाश आंबेडकरांनी फेटाळून लावले होते. मात्र वंचितला गळती लागल्याने पक्षात चिंतेचं वातावरण असल्याचंही बोललं जात आहे. विधानसभा निवडणूकीत जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने AMIMही वंचितमधून बाहेर पडला होता.
हेही वाचा...
हनीमूनआधी सासूने केली सूनेची कौमार्य चाचणी, नवरा म्हणाला 'लक्ष नको देऊ'