मुंबई, 18 ऑक्टोबर : राज्य सरकारने मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्याची विनंती पत्राद्वारे रेल्वे विभागाला केली. सरकारनेच लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवल्याने लवकरच याबाबतचा निर्णय होईल, अशी आशा मुंबई आणि परिसरातील महिलांमध्ये निर्माण झाली. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय न घेतल्याने महिलांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी महिलांच्या लोकल प्रवासावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला मायभगिनींकरिता लोकल सुरू व्हावी व नवरात्रीत त्यांची सोय होईल याची तमा नाही. भाजपाचा आवाज बंद का? घंटानाद का नाही?
राज्य सरकारने रेल्वेला महिलांना प्रवासाची मुभा द्या असे कळवले आहे. CPM रेल्वे बोर्डाची परवानगी लागेल अशी कारणं देत आहेत,' असा घणाघात सचिन सावंत यांनी केला आहे.
'राज्य सरकार,महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा आधीच निर्णय झाला होता. असं असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असताना जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. नवरात्र आहे हे माहीत असताना रेल्वेबोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिले पाहिजे,' अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
रेल्वेने नेमकी काय भूमिका घेतली?
पश्चिम रेल्वे जनसंपर्क विभाग वतीने सांगण्यात आलं आहे की, ' लोकल सेवा सुरू करावी अशी विनंती राज्य सरकारने पत्राने केली. पण लगेच लोक सुरू करता येणार नाही. रेल्वे बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे, तसंच लोकल सेवा वाढवण्यास काही यंत्रणा, कर्मचारी वाढवावे लागतील. ही सेवा लगेच एका दिवशी सुरू करणे शक्य नाही, तसे पत्राद्वारे आम्ही राज्य सरकारलाही कळवलं आहे.'