Home /News /mumbai /

कोरोनाच्या नव्या अवातारामुळे सतर्कता; विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी नवा नियम

कोरोनाच्या नव्या अवातारामुळे सतर्कता; विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी नवा नियम

UK सह युरोपीय देश आणि इतर 10 देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी विमानतळावर कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. इतर काय आहेत नवे नियम?

    मुंबई, 1 सप्टेंबर: कोविड विषाणूचे (New variants of Coronavirus) नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. UK सह युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आगमनानंतर स्वखर्चाने RTPCR चाचणी करणं बंधनकारक असेल. सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार (New guidelines for Covid-19 India), हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची (institutional quarantine) तरतूद रद्द करण्यात आली आहे. पण त्यांची कोरोना चाचणी मात्र बंधनकारक आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून खालील नमूद केल्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिनांक 3 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे. चाचणीच्या अनुषंगाने, याआधीच्या परिपत्रकांनुसार अपवाद करण्यात आलेले सर्व निर्णय आता रद्दबादल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना लस घेतलेले, दोन्ही डोस घेतलेले किंवा अन्य कुठलाही पर्याय आता नाही. सर्व प्रवाशांसाठी Covid Test बंधनकारक असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणारे अथवा आगमन होवून पुढे जाण्यासाठी दुसरे विमान निवडलेल्या इतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना (यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे वगळता) मागील 72 तासांमधील RTPCR चाचणीचा Negative अहवाल सादर करणे आवश्यक असेल. त्यानंतरच ते विमानतळ सोडू शकतात. असा निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. याशिवाय या सर्व प्रवाशांना स्वयंघोषणा-पत्र (self-declaration form) आणि हमीपत्र (undertaking) भरून मुंबई विमानतळावर अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना 14 दिवस गृह विलगीकरणात (home quarantine) राहणंही बंधनकारक असेल. या सर्व प्रवाशांच्या कोरोना चाचणीची सोय विमानतळावर करण्यात आली आहे. 600 रुपये दराने कोरोना चाचणी केली जाईल. याचा खर्च प्रवाशांनीच करायचा आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    First published:

    पुढील बातम्या