प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी
मुंबई, 16 जानेवारी : मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम पुन्हा सुरू होणार की, नाही यावर सर्वोच्च न्यायालय उद्या गुरुवारी अंतिम निर्णय देणार आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालय उद्या काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी 2005 मध्ये डान्सबारवर बंदी आणली होती.
डान्स बारमधला डिम लाईट, कर्कश गाण्यांचा आवाज, भडक मेकअपमध्ये 'तेहजीब' च्या नावाखाली अश्लील चाळे चालायचे. याचा नाद लागून अनेकांचे संसार रस्त्यावर आले. हेच डान्स बार माफियांचा अड्डा बनले होते. या सगळ्यांचा विचार करून 2005 मध्ये आर आर पाटलांनी हा डान्स बार बंदीचा निर्णय घेतला या निर्णयाचं तेव्हा भरभरून कौतुक झालं होतं.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात डान्सबार असोसिएशनने कोर्टात धाव घेतली होती. 2015 मध्ये सुप्रीम कोर्टाने असोसिएशनला दिलासा दिला होता.
आधी मुंबई हायकोर्टाने आणि 2013 सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरची बंदी उठवली. त्यानंतर 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने पुन्हा कायदा पास करून बंदी नव्याने लागू केली.
सुप्रीम कोर्टाने त्यावेळी राज्य शासनाच्या डान्सबार बंदीच्या निणर्याला स्थगिती देत राज्यात डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने डान्सबार सुरू करण्यासंदर्भात बार मालकांना जाचक अटी घातल्या. याविरोधात आक्षेप घेत बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
छमछमवर बंदीचा घटनाक्रम
- 2005 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्स बार बंद केले होते
- 2013 : सुप्रीम कोर्टानं सरकारची बंदीची याचिका फेटाळून लावली
- 2013 : बारमध्ये काम करणार्या महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला
- 2014 मध्ये डान्स बार बंदीच्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली
- 2015 : पण सुप्रीम कोर्टानं या बंदीच्या दुरुस्तीला स्थगिती दिली
- 2015 : डान्स बार बंदीच्या नियमनाचे अधिकार सरकारकडे, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
-2016 : डान्सबारला 2 दिवसांत परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश
-2016 : मुंबईत 10 वर्षांनंतर 6 डान्स बार होणार सुरू
- 2019 : उद्या डान्सबारवर अंतिम सुनावणी
====================================