मुंबई, 04 जानेवारी : PMC बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varash Raut) अखेर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या (ED) कार्यालयात हजर झाल्या आहेत. याआधीच ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर आज खुद्द चौकशीसाठी त्या ईडी कार्यालयात पोहोचल्या आहे.
वर्षा राऊत यांनी दुपारी 1 वाजेच्या सुमारास चौकशीसाठी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत. 5 जानेवारी रोजी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. परंतु, त्याआधीच आज वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत.
तीन दिवसांपूर्वी ईडीने या प्रकरणाशी संबंधीत एक खुलासा केला होता. 'संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि माधुरी प्रवीण राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत. या संस्थेकडून आधी 5625 रुपयांची रक्कम मिळाली आहे. पण 12 लाख रुपयांची कर्जाची रक्कम अद्याप बाकी आहे, असा खुलासा ईडीने आपल्या तपासातून केला होता.
तर दुसरीकडे पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. हा व्यवहार मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे ईडीने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडीकडे गेलं.
वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आले होते. त्यामुळेच हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे.
विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.