Home /News /mumbai /

काँग्रेसने डोळे वटारताच संजय राऊतांनी मागे घेतलं इंदिरा गांधींबद्दलचं 'ते' वक्तव्य

काँग्रेसने डोळे वटारताच संजय राऊतांनी मागे घेतलं इंदिरा गांधींबद्दलचं 'ते' वक्तव्य

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

    मुंबई,16 जानेवारी:शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत माफिया डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीविषयीचे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांनी आक्षेप घेताच अवघ्या दोन तासांत संजय राऊत यांनी दिवंगत इंदिरा गांधींबद्दलचे वक्तव्य मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. याआधी संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. संजय राऊतांची दिलगिरी.. इंदिरा गांधी या देशाच्या सर्वोच्च नेत्या होता. प्रभावशाली नेत्या, प्रखर राष्ट्राभिमानी नेत्या. आमच्याकडून इंदिरा गांधी यांची प्रतिमा भंग होईल, असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशा शब्दांत संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शायरने महाराष्ट्राचे मनोरंजन करणे चांगले राहील, अशा शब्दांत संजय निरुपम यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली होती. बोलण्यापूर्वी संयम राखावा.. इंदिराजी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी देशाच्या सुरक्षेशी कधीच तडजोड केली नाही. मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांच्याकडे चुकीची माहिती देणारे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो. तसेच राजकीय नेत्यांनी दिवंगत पंतप्रधानांविषयी बोलण्यापूर्वी संयम राखला पाहिजे, असे ट्वीट काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केले आहे. तर शिवसेनेच्या शायरने इतरांच्या हलक्या-फुलक्या शायरी ऐकवत महाराष्ट्राचे मनोरंजन करणेच चांगले राहील. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी अपप्रचार केल्यास त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येईल. राऊतांनी इंदिरा गांधींविषयी केलेले वक्तव्य मागे घ्यावे, असे ट्वीट संजय निरुपम यांनी केले सकाळी केले होते. इंदिरा गांधींवरच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांची काँग्रसेला प्रश्नांची सरबत्ती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संजय राऊतांच्या विषयावरून काँग्रेसवर प्रश्नांचा मारा केला आहे. इंडिरा गांधी मुंबईत का येत होत्या? अंडरवर्ल्डच्या मदतीने काँग्रेस निवडणुका जिंकत होती का? काँग्रेसला अंडरवर्ल्डचं फंडिंग होतं का? काँग्रेसला निवडणुका जिंकण्यासाठी मसल पावरची गरज पडायची का? छोटा शकील, दाऊद इब्राहिम मुंबईचे पोलीस आयुक्त कोण हे ठरवत होते, तर राजकारणाचं गुन्हेगारीकरणाची सुरुवात त्या कार्यकाळात सुरु झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोनियाजी, राहुलजी, प्रियांकाजींनी यांनी दिली पाहिजेत. इंदिराजींसारख्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर आरोप होऊनही काँग्रेसचे का ? मुंबईवर हल्ला करणा-यांना काॅंग्रेसनं साथ दिली का? यावर काॅंग्रेस अधिकृत खुलासा का करत नाहीये अशी प्रश्नांची सरबत्ती फडणवीस यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतकी लाचार झाला की, त्यांच्या नेत्यांवर आरोप झाल्यानंतर कोणीही बोलायला तयार नाहीत. दरम्यान इंदिरा गांधी खरंच करीम लालाला भेटत होत्या का याचे काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Indira gandhi, Maharashtra news, Milind deora, Sanjay raut

    पुढील बातम्या