Home /News /mumbai /

शरद पवारांच्या पुस्तकाला भगवा रंगाचं कव्हर, संजय राऊत म्हणतात....

शरद पवारांच्या पुस्तकाला भगवा रंगाचं कव्हर, संजय राऊत म्हणतात....

"आम्ही संसदेत सेंट्रल हॉलमध्ये सगळे भेटायचो. पण आता संवाद होऊ नये म्हणून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पत्रकारांना बंदी आहे. आमच्याकडे दारुगोळा खूप आहे, आम्ही तो वेळ आला की फोडू", असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई, 11 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध विषयांवर दिलेल्या 61 भाषणांवर आधारीत पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं. 'नेमकचि बोलणे' असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचं कव्हर हे भगव्या रंगाचं आहे. याच गोष्टीचा धागा पकडत संजय राऊत यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी 'अवघा रंग एक झाला' या अभंगाचा दाखल दिला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

"तुमच्या विचार ग्रंथाला भगवं कव्हर घातलं गेलंय. अवघा रंग एकची झाला. संजय राऊत कोणत्या रंगाला भुलत नाही. पण हा महाराष्ट्राचा रंग आहे. 61 विविध विषयांवरील भाषण या पुस्तकात आहेत. या पुस्तकाची प्रत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊ. शरद पवार सतत विचार देत असतात. नेमकचि बोलणे याची फोड करुन पंतप्रधान मोदींना सांगू", असं संजय राऊत म्हणाले.

'मी शरद पवारांना खुर्ची का दिली?'

"मी शरद पवार यांना खुर्ची का दिली? हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक, हा ग्रंथ वाचला पाहिजे. त्यांचा तो मान आहे. सध्या देशात विकृत राजकारण सुरु आहे, त्यावर पवारांनी 20-25 वर्षांपूर्वी ताशेरे ओढले. 30 वर्षांपूर्वी भाजपला देश एकसंघ नको हे सांगितलं. हे आम्हाला आता समजलं", अशा शब्दांत राऊतांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. "प्रश्न विचारणाऱ्यांची सध्या काय स्थिती आहे ते पाहतो. मात्र शरद पवार यांना प्रश्न विचारलेले आवडतात. त्यावर ते उत्तर शोधतात. विचार मांडायचाच नाही ही झुंडशाही आहे. याचा आज आपण सामना करत आहोत", अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. हेही वाचा : फुटबॉलर डिएगो माराडोना यांचं हरवलेलं घड्याळ सापडलं, भारतातून एकाला अटक

'पवारांची भाषणं ऐकताना यशवंतरावांची आठवण येते'

"शरद पवार यांची भाषणं ऐकताना दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार ऐकतोय, असं वाटलं. 61 भाषणात कुठेतरी यशवंतराव चव्हाण बोलत आहेत, असं वाटलं. या आधीही पवारांशी जेव्हा जेव्हा संपर्क साधला तेव्हा महाराष्ट्र, माणूस आणि माणुसकी दिसली. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 मुलाखती घेतल्या होत्या. पुढील पिढीला ते समजणं गरजेचं असतं", असं राऊत म्हणाले.

"आमच्याकडे भरपूर दारुगोळा, आम्ही तो वेळ आला की फोडू"

"आम्ही संसदेत सेंट्रल हॉलमध्ये सगळे भेटायचो. पण आता संवाद होऊ नये म्हणून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पत्रकारांना बंदी आहे. आमच्याकडे दारुगोळा खूप आहे, आम्ही तो वेळ आला की फोडू. या पुस्तकातील विचारांत सुसूत्रता आहे. त्या विचारांमध्ये फारसे बदल झालेले नाहीत", असं देखील ते म्हणाले. हेही वाचा : स्पीकरऐवजी वाजतीये शाळेची घंटा; मशिदीत शाळा भरवण्यास मुस्लीम समुदायाची परवागनी

पवार युतीच्या सरकारला पंतांचं सरकार म्हणाले होते, पण...'

"युतीचं सरकार असताना हे पंतांचं सरकार आहे असं पवार म्हणाले होते. मात्र तेही पवारांचं सरकार होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत नागपुरात त्यांनी विचार मांडले आहेत. ही 61 भाषणे हे विचार आहेत. वीर सुपुत्राबाबत वाद असताना त्यांनी विचार कसे मांडले हे युट्यूबवर जाऊन बघा. विरोधकांचा सन्मान करावा हे कळतं", असा टोला राऊतांनी भाजपला लगावला. "मराठी भाषेबाबत त्यांचे विचार सातत्याने मांडत आले आहेत. मुंबईवरील मराठी पगडा कमी होऊ नये असे विचार त्यांनी मांडले आहेत. तसेच मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पाहा. आम्हा तीन पक्षांना एकमेकांची आठवण येते, आम्ही तिन्ही पक्षांनी हात लांब केले आहेत", असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या