मुंबई, 21 जून : 'भारताच्या सर्व सीमा अशांत आहेत. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले! परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित आहे. मोदींच्या बाजूने आता कोण उभे राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली' अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी चीनवर वादावर आपली परखड भूमिका मांडली.
'भारत सारख्या देशात अधूनमधून कसल्या ना कसल्या तरी लाटा येतच असतात. कोरोनाच्या लाटेचा जोर कायम असतानाच देशात चीनविरोधी संतापाची लाट उसळली आहे, पण काही संताप हे षंढ असतात. असे षंढ संताप चीनच्या बाबतीत अनेकदा निर्माण झाले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग दोन वर्षांपूर्वी अहमदाबादेत पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून आले होते.
गलवानमध्ये हिंसक संघर्ष! चीनच्या फसवणुकीनंतर भारतानं तयार केला 'प्लॅन बी'
सर्व वाद मिटतील असे ते म्हणाले होते, पण तेव्हाही माझ्या मनात तेच विचार आले जे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबाबत फिडेल कॅस्ट्रो यांच्या मनात आले होते. या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. चार दिवसांपूर्वी लडाखच्या हद्दीत जो रक्तरंजित संघर्ष झाला तो पाहिल्यावर चीनचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला' असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
'नेहरूंच्या नावाने डंका पिटू नका'
'1975 नंतर प्रथम भारत व चिनी सैनिकांची लडाखच्या हद्दीत झटापट झाली. चीनने आपले 20 सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. की बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करून विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? 20 जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. 1962चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळे हरलो हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही' अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली.
महासत्ता काय करणार?
'गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले व आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ यावर हिंदुस्थानकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले व सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुस्थानच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार?' असा सवालही राऊतांनी उपस्थितीत केला.
मुजोर चीनला उत्तर देण्यासाठी IAFची लढाऊ विमाने सज्ज, हवाईदल प्रमुख लडाखमध्ये
'राहुल गांधी योग्य बोलले होते'
'पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांच्याही बाहुबली राजकारणाची हवा लडाख, गलवान व्हॅली प्रकरणात निघाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महिन्यापूर्वीच शंका उपस्थित केली होती की, चीनचे सैन्य लडाखमध्ये आपल्या भूभागात घुसले आहे. मोदी यांनी देशाला सत्य सांगावे. गांधी जे बोलत होते ते सत्य होते व पराभव लपविण्यासाठी गांधी यांना खोटे पाडले गेले' अशी बाजूही राऊत यांनी राहुल गांधींनी घेत मोदींवर टीकास्त्र सोडले.
'सीमेवर नाही, दिल्लीत गडबड'
पाकिस्तानचे सैन्य कारगिलपर्यंत पोहोचले हे समजताच पंतप्रधान वाजपेयींनी युद्धच पुकारले. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबडय़ात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले?
गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच आहे, असे फार पूर्वी मोदी म्हणाले होते, ते आता पटले, असा टोला राऊत यांनी मोदींना लगावला.
मोदी देशाचे ऐकणार आहे का?
'चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे. पाकिस्तानशी युद्ध झालेच तर ते परिचित भूभागावरून होणार असल्यामुळे हिंदुस्थानी सैनिक तेथे मुळीच कमी पडणार नाहीत, पण चीनच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. गलवान व्हॅलीत आपण खाली खोल कोसळलो आहोत. त्यातून बाहेर पडावे लागेल. पंतप्रधान मोदींबरोबर देश उभाच आहे, पण ते देशाचे ऐकणार आहेत काय? असा थेट सवाल राऊतांनी विचारला आहे.
Network18 Poll: चीनी वस्तूंवर बहिष्काराची 70 टक्के लोकांची तयारी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.