तंगड्या तोडण्याची भाषा करू नका.. संजय राऊतांचे उदयनराजेंना जशास तसे उत्तर

तंगड्या तोडण्याची भाषा करू नका.. संजय राऊतांचे उदयनराजेंना जशास तसे उत्तर

'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून शिवसेना-भाजपमध्ये आता चांगलीच जुंपली आहे.

  • Share this:

मुंबई,16 जानेवारी:'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून शिवसेना-भाजपमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि साताऱ्याचे भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या शब्दीक चकमक सुरू झाली आहे. उदयनराजे यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. पण तंगड्या तोडण्याची भाषा करू नका, तंगड्या प्रत्येकाला असतात, अशा शब्दांत राऊत यांनी उदयनराजे यांना सज्जड इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी पुण्यात बुधवारी झालेल्या लोकमतच्या एका कार्यक्रमात मुलाखतीनंतर गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, उदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही उत्तर देण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. तुम्ही जर इतरांच्या श्रद्धास्थानाबद्दल बोलत असाल, तर तुम्हालाही ऐकून घ्यावे लागेल. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा राखा. तंगड्या तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालत नाही, कारण तंगड्या सगळ्यांना आहेत. मोदींनाही लोक प्रश्न विचारतात. राष्ट्रपतींनाही लोक प्रश्न विचारतात. ही लोकशाही आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तंगडे तोडण्याची भाषा बोलू नये. तुम्ही राजकारणाबाहेर असतात तर चालले असते. छत्रपती शिवाजी महाराज कुणाची वैयक्तिक मालकी नाही. आम्ही पण शिवरायांचे वंशज आहोत. महाराष्ट्राची 11 कोटी जनता शिवरायांची वंशज असल्याचे संजय राऊत यांना सांगितले.

संजय राऊतांनी कोल्हापूरचे संभाजीराजे, साताराचे शिवेंद्रराजे यांची स्तुती सुद्धा केली. कोल्हापूरमधील सध्याचे शाहू महाराज यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांचे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकतंत्रात चालणार नाही. तंगड्या सर्वांनाच असतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

माफिया गुंड करीम लाला याला इंदिरा गांधी भेटायच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, देशातील अनेक नेते, मंत्री करीम लाला याला भेटत होते. तसेच इंदिरा गांधी देखील भेटत होत्या. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेटत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्यावेळी काँग्रेसवालेही शांत होते, असे संजय राऊत म्हणाले.

First Published: Jan 16, 2020 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading