मुंबई, 14 जानेवारी : राज्यातील दुकानांच्या पाट्या आता मराठीत (Marathi boards on Shop) असणार आहेत. त्या संदर्भात राज्य सरकारने (Maharashtra Government) निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कुणी या निर्णयाचं स्वागत करत आहे, कुणी याचं श्रेय घेत आहे तर कुणी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. मराठी पाट्यांचं श्रेय हे मनसेचं असल्याचं राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) म्हटलं त्यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, कुणी काय सल्ला दिलाय यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळी शिवसेना स्थापन केली त्यावेळीपासून हे आंदोलन सुरू आहे. आता असं आहे की अनेक जण आमच्या पक्षातून बाहेर गेले पण विचार तोच घेऊन गेले आहेत ना? कोणाला काय बोलतायत किंवा बोलतील यावर महाविकास आघाडीचं किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. मराठी अस्मिता राहणार त्याच्याशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही.
वाचा: दुकानदाराकडे सध्या खायला पैसे नाहीत, पाट्या कशा बदलणार?, इम्तियाज जलील यांचा सवाल
दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं
दुकानावरील पाट्याही आता मराठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्विट करत हे श्रेय केवळ महाराष्ट्र सैनिकांचं असल्याचं म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये. परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.
काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय गेतला. तेव्हा त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं आहे. त्या सर्वांना मन:पूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी मराठीतच असावी, सरकारचा निर्णय
दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती.
बुधवारी (12 जानेवारी 2022) मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackeray, Sanjay raut, महाराष्ट्र