भाजपच्या 3 नेत्यांकडून सरकार पाडण्याचा हा डाव, संजय राऊतांचा घणाघाती आरोप

भाजपच्या 3 नेत्यांकडून सरकार पाडण्याचा हा डाव, संजय राऊतांचा घणाघाती आरोप

'ईडी आणि केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईक हे टोकण आहे.

  • Share this:

मुंबई, 28 डिसेंबर : 'राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. भाजपचे 3 नेते हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहे' असा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना भाजपला जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही राऊत यांनी दिली.

ईडीच्या नोटीसीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'बायकांच्या आड हल्ले करणे याला नामर्दपणा म्हणतात', अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.

'भाजपचे 3 नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहे. त्यानुसारच ही नेते बोलत आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहे. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे' असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केलाय.

'ईडी हा काही महत्त्वाचा विषय नाही. कधी काळी या संस्थांना प्रतिष्ठा प्राप्त होत्या. सीबीआय, आयकर विभागाने काही कारवाई केली तर त्यात गांभीर्य होते. पण, गेल्या वर्षात ईडीने नोटीस बजावणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने भडास काढणे हे गृहीत धरले आहे.  आतापर्यंत एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आल्या आहे. शरद पवार यांना सुद्धा ईडीने नोटीस बजावल्या आहे' असंही राऊत म्हणाले.

'राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहे. राजकारणामध्ये समोरासमोर येऊन लढण्याची इच्छा असायला हवी. घरातील मुलांना, महिलांवर अशी कारवाई करत असाल तर याला नामर्दपणा म्हणतात. असा नामर्दपणा जण कुणी करत असेल तर शिवसेना त्याच शब्दांत आणि त्याच थरारला जाऊन उत्तर दिले जाईल, जर लढायचे असेल तर समोरासमोर येऊन लढावे' असं आव्हान राऊत यांनी दिले.

'फडणवीस म्हणाले की, काही केले नसेल तर ईडीची नोटीस येणार नाही. नोटीस हे काही ब्रम्ह वाक्य आहे का? आमच्यापैकी कुणीही काही केले नाही.  आता तुम्हाला घाबरावे लागणार आहे' असा इशाराही राऊत यांनी दिला.

'गेल्या दीड महिन्यांपासून आमच्याकडे ईडी पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही कागदपत्र हवी आहे, ती वेळोवेळी पुरवली आहे. यापैकी कोणत्याही अशा पत्रात भाजपचे नेते जे पीएमसी घोटाळा, HDIL प्रकरणाचा उल्लेख करत आहे तो यात नाही. भाजपचे नेते माकडाप्रमाणे उड्या मारत आहेत. ईडी आणि भाजप नेत्यांची हातमिळवणी झाली आहे', असा आरोपही राऊत यांनी केला.

'ईडी आणि केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईक हे टोकण आहे. डिसेंबरपर्यंत भाजपची डेडलाईन होती. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी ईडीकडून प्रयत्न सुरू आहे. बायकांच्या पदराच्या आड खेळी खेळीत आहे' असंही राऊत म्हणाले.

'माझ्या पत्नीच्या खात्यावर 10 वर्षांपूर्वीचे हे व्यवहार आहे. मुंबईत घर घेण्यासाठी 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे. भाजप सरकार सत्तेवर येत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे' असा खुलासाही राऊत यांनी केला.

Published by: sachin Salve
First published: December 28, 2020, 2:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या