मुंबई, 26 नोव्हेंबर : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेत ज्या नेत्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली त्यापैकी एक असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता एक मोठं भाकित केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (2024 Lok Sabha Election) संदर्भात संजय राऊत यांनी भाकित करत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकणार याबाबत वक्तव्य केलं आहे. (Sanjay Raut big prediction about 2024 Lok Sabha Election)
... तर 48 जागांपैकी 45 जागा आम्हीच जिंकू
2024च्या लोकसभा निवडणुकीत जर महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली तर महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 45 जागा महाविकास आघाडीच जिंकेल असं भाकित संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी साम टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढेल. जर एकत्र लढलो तर नक्कीच महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल. एकत्र लढण्याचा फायदा काँग्रेस पक्षालाही होईल. आज काँग्रेसची महाराष्ट्रात लोकसभेची असलेली जागाही वाढतील. मात्र, यासाठी सर्वांनी एकत्र येत संयमाने भूमिका घ्यावी लागेल.
वाचा : शरद पवारांसोबतची बैठक संपल्यावर Sanjay Raut यांनी दिली महत्त्वाची माहिती
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदावर राहणार
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असलं तरी मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे राहणार आहेत. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील या केवळ अफवा आहेत. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाहीये. ठाकरे आणि पवार एकत्र राहिले तर राज्याचंच नाही तर देशाचंही राजकारण बदलेल असंही संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला ते नक्कीच काही चांगल्या गोष्टी सुचवत असतात. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत कुठल्याही तक्रारी नाहीयेत. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत काही प्रमाणात वाद होत असतात पण राज्यात कुठल्याही कुरबुरी नाहीयेत असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा : मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
'पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील'
तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे की, हे सरकार जाईल म्हणून. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने हे सरकार काही जात नाही. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं पावर स्टेशन मी आत्ता जिथे आहे तेथे आहे.
चंद्रकांत पाटलांना शपथविधीचे झटके
पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे होत आहेत. बहूतेक त्याच शपथविधीचे झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत आणि म्हणून ते सारखं बोलत आहेत की, सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा इतकेच मी त्यांना सांगू इच्छितो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Sanjay raut, महाराष्ट्र