मुंबई, 15 जानेवारी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कौटुंबीक भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांच्या सोबत त्यांची पत्नी वर्षा राऊत आणि मोठी मुलगी पूर्वशी ही देखील सोबत होती.
आज सकाळी संजय राऊत हे आपल्या कुटुंबीयांसोबत शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. संजय राऊत यांची मोठी मुलगी उर्वशी हीचा साखरपूडा येत्या काही दिवसांत होणार आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत कुटुंबासह शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते.
दरम्यान, PMC बँक गैरव्यवहार प्रकरणी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) नोटीस बजावली होती. त्यानंतर 4 जानेवारी रोजी स्वत: वर्षा राऊत या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. त्यांनी ईडीला काही कागदपत्रही दिली होती.
तर ईडीने याआधी या प्रकरणाशी संबंधीत एक खुलासा केला होता.'संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि माधुरी प्रवीण राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत. या संस्थेकडून आधी 5625 रुपयांची रक्कम मिळाली आहे. पण 12 लाख रुपयांची कर्जाची रक्कम अद्याप बाकी आहे, असा खुलासा ईडीने आपल्या तपासातून केला होता. त्यानंतर आता वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.