'नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत'

'नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत'

हिंदू मुलींना पळवून बलात्कार व हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर : 'एका नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. ‘बेटी बचाव’च्या नारेबाजीत एका बेटीवर बलात्कार व हत्या झाली. हिंदू मुलींना पळवून बलात्कार व हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले. राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. हे कसले स्वातंत्र्य! एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करून जाळला जातो' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी हाथरस प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त करत परखड मत व्यक्त केले आहे.

'मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक पीडितेच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी ‘बचाव… बचाव’ असा आक्रोश करीत तडफडून मेली. पीडितेला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच ‘काय हा अन्याय?’ असे बोंबलणारा ‘मीडिया’देखील कंठशोष करताना दिसला नाही. का? ती एक साधी सरळ मुलगी होती. त्यामुळे तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर चिता पेटवून राख करण्यात आली. हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारून फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही' असा परखड सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला.

'हिमाचलच्या एका नटीच्या बेताल वक्तव्यामागे, बेकायदेशीर कृत्यांमागे जे महान महात्म्ये उभे राहिले ते हाथरस बलात्कार प्रकरणात साफ अदृश्य झाले. या सर्व प्रकारात अनेक महिला नेत्या, त्यांच्या संस्था आणि संघटना जणू मूकबधीर होऊन बसल्या आहेत. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढय़ात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती. राष्ट्रीय महिला आयोग हे नक्की काय प्रकरण आहे ते समजत नाही. कंगना राणावत हिने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केले तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिचे थोबाड फोडतील, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा, सुरक्षेचा मुद्दा समोर आणला. सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. तोच महिला आयोग ‘हाथरस’ प्रकरणात चूप बसला. हाथरसच्या बलात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचूनही काहीच केले नाही. हा सर्वच प्रकार धक्कादायक आहे' असा संतापही तिने व्यक्त केला.

'2012 साली दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडले तेव्हा संपूर्ण भाजपा रस्त्यावर उतरला होता. संसद बंद पाडली होती. मीडियाने निर्भयासाठी ‘न्याय’ देणारी यंत्रणाच उभारली होती. निर्भया तेव्हा सगळय़ांचीच बहीण व मुलगी झाली. मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली? की ती दलित असल्यामुळेच न्यायापासून वंचित राहिली? रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. ते कंगना राणावतला घरी जाऊन भेटले व त्यांचे कार्यकर्ते आधी विमानतळावर तिच्या स्वागतासाठी पोहोचले, पायल घोष या नटीस घेऊन ते राज्यपालांना भेटले. मात्र हाथरसची एक दलित कन्या मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला; तेव्हा आयुष्यमान आठवले नटय़ांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते. देशातील दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस आहे' असं म्हणत राऊत यांनी रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली.

'जे पुढे येऊन बोलतात त्यांना धमकावले जाते. जे हाथरसच्या मुलीबाबत घडले.हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँगेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबास भेटायला निघाले तेव्हा त्यांना पोलिसांनी फक्त अडवले असे नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले, असभ्यपणे धक्काबुक्की केली. ज्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले व देशाच्या अखंडतेसाठी बलिदान दिले. राहुल गांधी हे त्यांचे नातू आहेत एवढे भान तरी कॉलर पकडणाऱ्यांनी ठेवायलाच हवे होते. एका ‘निर्भया’साठी कधीकाळी देश रस्त्यावर उतरला होता हे इतक्या लवकर मोदींचे सरकार विसरून गेले. 2014 ते 2019 या काळात 12,257 गँगरेप उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश या चार राज्यांत झाले आहेत, पण जात, धर्म, राजकीय प्रतिष्ठा पाहून अशा प्रकरणांत न्याय केला जातो' असं मतही राऊत यांनी व्यक्त केले.

Published by: sachin Salve
First published: October 4, 2020, 8:36 AM IST
Tags:

ताज्या बातम्या