उशिरा निकालाला संजय देशमुखच जबाबदार !,सरकारच्या सुचनेनंतरही 'आॅनलाईन'चा निर्णय रेटला

राज्य सरकारने 28 एप्रिल 2017 रोजीच एकाचवेळी सर्व पेपरची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करू नये, अशा सूचना व्यवस्थापन परिषदेच्या मिटिंगमध्ये दिल्या होत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2017 07:56 PM IST

उशिरा निकालाला संजय देशमुखच जबाबदार !,सरकारच्या सुचनेनंतरही 'आॅनलाईन'चा निर्णय रेटला

संजय सावंत,प्रतिनिधी, मुंबई

12 आॅगस्ट : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख हेच वैयक्तिक परीक्षांचे निकाल उशिरा लागण्यास कारणीभूत आहेत. राज्य सरकारने 28 एप्रिल 2017 रोजीच एकाचवेळी सर्व पेपरची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करू नये, अशा सूचना व्यवस्थापन परिषदेच्या मिटिंगमध्ये दिल्या होत्या. या बैठकीतल्या नोंदी आयबीएन लोकमतच्या हाती आल्या असून कुलगुरू देशमुख यांनी या ऑनलाईन पेपर तपासणीची जबाबदारी स्वत:वर घेतल्याची नोंदही आहे.

राज्य सरकारच्या वतीने 28 एप्रिलच्या व्यवस्थापन परिषदेला सिद्धार्थ खरात, सहसचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, डॉ. रोहिदास काळे आणइ सुभाष महाजन यांच्यासह कुलगुरू डॉ. संजय देशमुख, वित्त आणि लेखाधिकारी विजय तायडे, परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक दीपक वसावे उपस्थित होते.

संजय देशमुख यांनी ऑनलाईन तपासणीचा निर्णय घेतला. इतर सदस्यांचा विरोध कुलगुरुंनी डावलला. २ लाख पेपर अजूनही तपासायचे आहेत. ६० हजार विद्यार्थ्यांचे निकाल लागणं बाकी आहेय त्यामुळे १५ ऑगस्टची डेडलाईनही पाळली जाणार नाही, अशी दाट शक्यता आहे.

राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सी.विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्यात यावा असे आदेश दिले होते. मात्र 31 जुलैपर्यंत 477 अभ्यासक्रमांपैकी केवळ 120 अभ्यासक्रमांचेच निकाल लागले, त्यानंतर विद्यापीठाकडून 5 ऑगस्ट ही दुसरी डेडलाईन देण्यात आली. मात्र ही डेडलाईननेही कुलगुरूंनी पाळली नाही. आता विद्यापीठाकडून 15 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लागतील अशी तिसरी डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र आजही सुमारे 2 लाख उत्तरपत्रिका तपासणे बाकी असून 60 हजार विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Loading...

अखेर कुलपती सी.विद्यासागर राव यांनी 1 ऑगस्ट रोजी कुलगुरू संजय देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली. मात्र या नोटीसला उत्तर न देता कुलगुरूंनी 9 ऑगस्ट रोजी सुट्टीवर जाण्यासाठी अर्ज दिला. कुलपतींनीही त्यांचा रजेचा अर्ज मान्य करत त्यांना रजेवर पाठवले आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.

या सर्व गोंधळामध्ये परदेशी शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना निकाल वेळेवर न लागल्यानं मानसिक त्रासाला करिअरबाबतही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लाखो विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लावणारे कुलगुरू हे सध्या सुट्टीवर आहेत तर नवीन कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे हे निकाल उशिरा लागण्याचा अभ्यास करीत आहेत. एकूणच लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळून कुलगुरू सुट्टीचा आनंद घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2017 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...