Home /News /mumbai /

'संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो', संभाजीराजेंच्या समर्थकांचा Video Viral

'संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो', संभाजीराजेंच्या समर्थकांचा Video Viral

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    मुंबई, 26 मे : खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संभाजीराजेंचे रायगडावरील आणि इतर काही फोटो आहेत. या फोटोंमधून संभाजीराजेंच्या समर्थकांना काहीतरी सूचित करायचं आहे हे लक्षात येतंय. संभाजीराजेंच्या समर्थकांकडून काल एक फोटो व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर आज एक व्हिडीओ संभाजीराजेंच्या समर्थकांकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत संभाजीराजेंचे समर्थक शिवसेना आणि इतर पक्षांना मोठा इशारा देत असल्याचं निदर्शनास येत आहे. राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय. कारण संभाजीराजे या जागेवर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी याआधी केली होती. त्यांनी राज्यातील सर्व पक्षांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेने त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी काही अटी ठेवल्या होत्या. पण संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणू अर्ज दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली होती. शिवसेनेच्या अटींमुळे संभाजीराजेंचे समर्थक आणि काही मराठा संघटना संतापले होते. त्यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यानंतर आता संभाजीराजेंचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. (सव्वा 8 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपच्या नरेंद्र मेहतांना कोर्टाकडून काहिसा दिलासा) संभाजीराजेंच्या समर्थकांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये काही डायलॉग आहेत. या डॉयलॉगबाजीतून इतर पक्षांना इशारा देण्यात आला आहे. "शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. पण त्या आधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम उभी राहिली आहे त्याचं काय? संभाजीला समजून घेण्याकरिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजीचं करुन घ्यावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो", असा इशारा संबंधित व्हिडीओत देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांमधील राजकीय घडामोडींनंतर आता संभाजीराजे आपली भूमिका मांडणार आहेत. संभाजीराजे उद्या सकाळी अकरा वाजता प्रसारमाध्यमांसमोर येऊन मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या