मुंबई, 18 फेब्रुवारी : 'चीन (China) घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले? प्रश्न इतकाच आहे की, चीनचे सैन्य आमच्या हद्दीत इंचभरही घुसलेले नाही, विरोधक भ्रम आणि अफवा पसरवत आहेत, असे जे गेले वर्षभर सरकारतर्फे सर्वच पातळ्यांवर सांगितले गेले, त्या सर्व थापाच होत्या असेच आता स्पष्ट झाले आहे. चिनी सैन्य माघार घेत असल्याचा उत्सव सरकारनेच सुरू केला. याला कुणी विजयाचा उत्सव म्हणत असतील तर त्यांचे मेंदू तपासायला हवेत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे? असा सवाल उपस्थितीत करत शिवसेनेनं (Shivsena) मोदी सरकारवर (Modi Goverment) निशाणा साधला आहे.
भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या चीन सैन्याने अखेर माघार घेतली. याच मुद्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
'चीनचे हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेले सैन्य माघारी जात आहे या घटनेचा राजकीय उत्सव सुरू झाला आहे. वर्षभर चिनी सैन्याने आमच्या जमिनीवर वीसेक किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. त्या संघर्षात आमचे 20 जवान गलवान व्हॅलीत शहीद झाले. सैनिकांच्या बलिदानावर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडले. या काळात पंतप्रधानांसह भाजपचे अनेक नेते व मंत्री अनेक फुटकळ विषयांवर बोलत राहिले, पण चीनच्या घुसखोरीवर प्रश्न विचारले की, पलायन करीत. शेवटी चारेक दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती देऊन चीनशी समझोता झाल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मोदी हे दोन महिन्यांपूर्वी सांगत होते, चीनने आमच्या हद्दीत अजिबात घुसखोरी केलेली नाही. तेच पंतप्रधान आता चीनने आपली जमीन मोकळी केल्याचे सांगत आहेत. म्हणजे चीनने घुसखोरी केली हे सत्य होते व पंतप्रधान देशाशी खोटे बोलत होते. आता या विषयाचा जो राजकीय विजयोत्सव सुरू आहे तो गंमतीचा आहे' अशी टीका सेनेनं पंतप्रधान मोदींवर केली.
नॅशनल क्रश Rashmika Mandanna चा स्पोर्टी लूक व्हायरल; PHOTOS पाहून चाहते घायाळ
'चीन माघारी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदुस्थानी संरक्षण खात्याच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय आहे हे मान्य, पण चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. संसदेत विरोधकांना यावर प्रश्न विचारू दिले नाहीत. राहुल गांधींनी काही प्रश्न चीनसंदर्भात उपस्थित केले की, पन्नास वर्षांपूर्वी तुमच्या पणजोबांमुळे चीनने हिंदुस्थानची जमीन कशी घेतली वगैरे थडगी उकरण्यातच राज्यकर्ते धन्यता मानत राहिले. पन्नास वर्षांपूर्वी चीनने जमीन घेतली म्हणून आजची घुसखोरी माफ होत नाही. कालचे काल, आजचे बोला! पण अखेर एक वर्षाने चीनप्रश्नी सरकारला कंठ फुटला' असा टोलाही सेनेनं लगावला.
पश्चिम बंगालचे मंत्री झाकीर हुसैन यांच्या Bomb Attack, हल्ल्याचा LIVE VIDEO आला
'चीनचे सैन्य ‘पँगाँग’वरून परत जात आहे व त्याचे राजकीय सोहळे सुरू झाले आहेत. पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणी किनाऱयावरून सैन्य माघारीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. म्हणजे किती मोठय़ा संख्येने हे लाल सैन्य आपल्या हद्दीत घुसले होते याची कल्पना यावी. रणगाडे, तोफा, मोठा शस्त्रसाठा घेऊन चिनी सैनिक लडाखमध्ये घुसले. घुसखोरी करताना जो संघर्ष झाला त्यात आमचे 20 जवान कामी आले. आता जो माघारीबाबत समझोता झाला त्यानुसार चीनचा कायमस्वरूपी तळ आता फिंगर 8 च्या पूर्वेला तर हिंदुस्थानी सैन्याचा फिंगर 3 वर असेल. आपली एक इंचही जमीन चीनला गेली नाही, आपण काहीही गमावलेले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. राजनाथ सिंह यांनी संसदेत चीनच्या माघारीसंदर्भात निवेदन केले तेव्हा पक्षभेद विसरून सगळ्यांनीच बाके वाजवून संरक्षणमंत्र्यांचे अभिनंदन केले, पण विरोधी पक्षाला सरकारला काही प्रश्न विचारायचे होते, ते विचारू दिले गेले नाहीत. विरोधकांनी प्रश्न विचारले असते तर असे काय आभाळ कोसळले असते? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.