Home /News /mumbai /

भास्कर जाधवांना पुन्हा धक्का, शिवसेनेनं खोडून काढला दावा

भास्कर जाधवांना पुन्हा धक्का, शिवसेनेनं खोडून काढला दावा

'आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ‘मंत्री करतो’ असा शब्द दिल्याची माहिती नाही.'

    मुंबई, 2 जानेवारी : मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्यानंतर शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मात्र हा वादा आता शिवसेनेकडून खोडून काढण्यात आला आहे. 'आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे काही म्हणणे मांडले आहे. ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले व येताना श्री. उद्धव ठाकरे यांनी काही शब्द दिल्याचे ते म्हणतात. आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ‘मंत्री करतो’ असा शब्द दिल्याची माहिती नाही. शिवसेना परिवारात सामील व्हा. एकत्र मिळून राज्य घडवू असा शब्द त्यांनी नक्कीच दिला असावा. बच्चू कडू, शंकरराव गडाख, येड्रावकर यांना दिलेला शब्द पाळला आहे हे दिसलेच आहे. मंत्रिमंडळ तीन पक्षांचे आहे. त्यामुळे शब्द देण्यावर मर्यादा होत्या,' अशी भूमिका 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून मांडण्यात आली आहे. 'प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारानंतर असंतोषाच्या अशा वावटळी उठतच असतात, ठिणग्या उडतच असतात. आधीचे फडणवीस सरकारही या फेऱ्यातून सुटले नव्हते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा काहीजणांसाठी आनंदवार्ता असली तरी हायकमांडसाठी डोकेदुखी ठरत असते. तरी बरे ठाकरे सरकारने विस्तारात सगळ्या जागा भरल्या. दोन-चार जागा शेवटपर्यंत शिल्लक ठेवून नाराजांना गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत राहायचे हे धंदे मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत. एक मजबूत आणि अनुभवी मंत्रिमंडळ सत्तेवर आले. त्यांना काम करू द्या,' असं आवाहनही सामनातून करण्यात आलं आहे. आंदोलक ते मंत्री, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना धडा शिकवणाऱ्या बच्चू कडूंचा प्रवास काँग्रेस आमदाराचे टोचले कान 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विस्तार रखडला होता हे खरे, पण तो मार्गी लागला आहे. विस्तारानंतर नाराजांनी असंतोषाच्या ठिणग्या टाकल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारानंतर असंतोषाच्या अशा वावटळी उठतच असतात, ठिणग्या उडतच असतात. आधीचे फडणवीस सरकारही या फेऱ्यातून सुटले नव्हते. त्यामुळे त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील तर त्यांनी त्या दाबून ठेवायला हव्यात. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेत ‘इच्छुकां’ची मांदियाळी मोठी होतीच. त्यातून निवड करावी लागली, पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांच्या समर्थकांनी ‘राडा’ केला. ‘राडा’ हा शब्द काँग्रेस संस्कृतीला शोभत नाही, शिवसेनेवर ‘राडेबाज’ असा शिक्का काँग्रेसने अनेकदा मारला, पण थोपटे यांच्या समर्थकांनी केलेले कृत्य ‘राडा’ संस्कृतीत मोडणारे आहे. थोपटे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली व नंतर निषेधही केला इथपर्यंत ठीक. नंतर संताप अनावर झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचेच बॅनर्स जाळले. त्याही पुढे जाऊन हे सर्व लोक पुण्यात पोहोचले व त्यांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयावरच हिंसक हल्ला केला. कार्यालयाची मोडतोड केली. नेत्यांच्या तसबिरी फोडून चक्काचूर केल्या. काँग्रेस नेत्यांचा अर्वाच्य भाषेत उद्धार केला. संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात घेतले नाही याबाबत ही खदखद असली तरी समर्थकांनी ज्याप्रकारे ही खदखद बाहेर काढली ती काँग्रेस संस्कृतीत मोडणारी नाही. (आता संग्राम थोपटे यांनी या संदर्भात इन्कार केला असला तरी शेवटी प्रकार घडला आहे.) मंत्रीपदाशिवाय राजकारण सुने व जीवन उणे अशा वातावरणाचे हे फळ आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं आमदार संग्राम थोपटे यांना फटकारलं आहे. प्रणिती शिंदे यांच्याविषयी भाष्य 'काँग्रेस पक्षात प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्या कर्तबगार आहेत व मंत्रीपदासाठी योग्य होत्या, पण काँग्रेसच्या वाट्याला जो ‘बारा’चा कोटा आला त्यात त्यांना बसवता आले नाही. त्यामुळे त्यांचे समर्थकही नाराज झाले व त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधींना रक्ताने पत्रे लिहिली. शिंदे परिवाराचे काँग्रेसशी रक्ताचे नाते आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या गृहमंत्री पदापर्यंतची सर्व पदे सुशीलकुमार शिंदे यांना गांधी परिवार आणि काँग्रेसमुळेच भूषवता आली, हे प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी समजून घेतले पाहिजे व रक्त वाया घालवण्यापेक्षा ते पुढच्या राजकीय युद्धासाठी जपून ठेवले पाहिजे,' असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे. 'नैवेद्य दाखवत राहायचे हे धंदे मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत' काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने ‘पाठिंबा’ देणाऱ्या घटक पक्षांवर मेहेरनजर केल्याचे दिसत नाही. हे काम शिवसेनेने केले. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचा धक्का दिला. आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणास राम राम ठोकण्याची त्यांची घोषणा सनसनाटी ठरली. मात्र नंतर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी त्यांची समजूत घातली आणि आता प्रकाश सोळंकेंची नाराजीही दूर झाली आहे. सगळे ठीकठाक आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा काहीजणांसाठी आनंदवार्ता असली तरी हायकमांडसाठी डोकेदुखी ठरत असते. तरी बरे ठाकरे सरकारने विस्तारात सगळ्या जागा भरल्या. दोन-चार जागा शेवटपर्यंत शिल्लक ठेवून नाराजांना गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत राहायचे हे धंदे मुख्यमंत्र्यांनी केले नाहीत. एक मजबूत आणि अनुभवी मंत्रिमंडळ सत्तेवर आले. त्यांना काम करू द्या,' अशी भूमिका 'सामना'तून मांडण्यात आली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Bhaskar jadhav, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या