पंतप्रधान मोदी अध्यात्माच्या मार्गाने निघाले, शिवसेनेचा टोला

पंतप्रधान मोदी अध्यात्माच्या मार्गाने निघाले, शिवसेनेचा टोला

'आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे'

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : 'पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते' असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या भूमिकेवर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे.

'पंतप्रधान मोदी  राष्ट्राला उद्देशून मंगळवारी संबोधन करणार आहेत, असे जाहीर केल्यापासून अनेकांच्या झोपाच उडाल्या होत्या तर कित्येक जण आस लावून टीव्हीसमोर बसले होते. पण यापैकी काहीच घडले नाही. मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही व कुणास तूप-लोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केले. मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र व छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरू केलेली दिसते' असा टोला सेनेनं लगावला.

मोदींचे भाषण हे पंतप्रधानांचे नव्हते तर एका चिंताग्रस्त पालकाचे होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेत जे संबोधन उद्धव ठाकरे करतात त्याच पद्धतीचे राष्ट्रीय संबोधन मोदी यांनी दिल्लीत बसून हिंदीतून केले. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणास नाके मुरडणाऱयांनी मोदींच्या भाषणास दाद दिली आहे. मोदी यांचे भाषण लोकांना आवडणार नाही व सोशल मीडियावर ‘डिसलाइक’चा पाऊस पडेल, असे भय वाटल्याने ‘डिसलाइक’चे बटनच ‘ब्लॉक’ केले. पण तसे करण्याची गरज नव्हती. मोदींचे 10-12 मिनिटांचे भाषण माहितीपूर्ण होते. मोदी यांचे राष्ट्रीय संबोधन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काळजीपूर्वक ऐकले असेलच. लोक गर्दी करतील अशी ठिकाणे इतक्यात उघडता येणार नाहीत. कारण लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. हे देशाचे पंतप्रधान सांगतात. तेव्हा त्याचा विचार करायला हवा, असं म्हणत शिवसेनेनं राज्यपालांनाही टोला लगावला.

'बेरोजगारीचा भस्मासुर उसळला आहे त्यास कसा अटकाव करणार? यावर पंतप्रधान भूमिका मांडतील, असे वाटले होते. पण मोदींनी चकवा दिला. पंतप्रधानांनी संध्याकाळी सहाच्या भाषणात चिनी सैनिकांच्या घुसखोरीवर बोलावे, आमच्या हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकांना उचलून कधी बाहेर फेकणार ते सांगावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले होते. पण त्यापैकी एकाही विषयाला मोदी यांनी स्पर्श केला नाही. मोदी राजकीय व प्रशासकीय असे काहीच बोलले नाहीत. त्यांनी आध्यात्मिक मार्गाने राष्ट्राचे प्रबोधन केले' असा टोलाही सेनेनं लगावला.

'सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी सरकार शर्थ करेल, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा व गुरूनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे', असा सल्लावजा टोलाही पुन्हा एकदा शिवसेनेनं लगावला.

Published by: sachin Salve
First published: October 22, 2020, 9:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या