Home /News /mumbai /

शॉपिंगला आलेल्या महिलांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना Porn Video पाठवायचा सेल्समन

शॉपिंगला आलेल्या महिलांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना Porn Video पाठवायचा सेल्समन

तसल्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. काही महिलांना त्यांच्या मोबाईलवर unknown नंबरवरून अश्लील फोटो whatsapp करण्यात आले. एका महिलेने याविरोधात तक्रार केल्यानंतर या विकृत माणसाचे काळे धंदे समोर आले आहेत.

    मुंबई, 26 नोव्हेंबर : तुमच्या मोबाईलवर कुठल्या अपरिचित नंबरवरून नको ते मेसेज येत असतील, तर दुर्लक्ष करू नका. मुंबईत खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेला असेच अपरिचित नंबरवरून अश्लील फोटो आणि Porn Video  व्हॉट्सअपवरून पाठवण्यात आले. ती महिला फक्त तो नंबर ब्लॉक करून थांबली नाही, तर त्याविरोधात तिने पोलिसात तक्रार केली. त्यामुळे त्या विकृत माणसांपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्याच्या मुसक्या कर्नाटकात बांधण्यात आल्या. हा मनुष्य महिलांच्या कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून कामाला होता, असं उघड झालं आहे आणि त्याने आतापर्यंत अशा अनेक महिलांना असे अश्लील फोटो पाठवले. महिलांच्या मोबाईलवर नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या कर्नाटकमधील एका सेल्समनला मुंबई पोलिसांनी या प्रकरणी  अटक केली आहे. इक्बाल शेख (29) असं या सेल्समनचं नाव असून मुंबई पोलिसांच्या युनिट 9 ने त्याला तेलंगणातून ताब्यात घेतलं, असं वृत्त मिड डे ने दिलं आहे. 'कोणत्याही महिलेबाबत असा प्रकार घडत असेल तर त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी,’ असं आवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख मिलिंद भारंबे यांनी केलं आहे. इक्बाल सणासुदीच्या काळात महिलांच्या कपड्यांच्या दुकानात काम करत होता आणि दुकानात आलेल्या महिलांकडून त्यांचे फोन नंबर घ्यायचा. नंतर या नंबरवर व्हॉट्सअपवरून पॉर्नोग्राफिक वेबसाइटवरचे नग्न आणि अश्लील व्हिडिओ त्यांना पाठवून त्यांचा छळ करायचा. तो सतत ठिकाणं आणि फोन नंबर बदलत होता. बहुतेक महिला या प्रकरणी दुर्लक्ष करतात किंवा पोलिसांपर्यंत पोहोचल नाहीत. त्यामुळे त्याचा शोध घेणं अवघड झालं, असं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारंबे यांनी मिड डे ला दिलेल्या माहितीनुसार, ‘एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 40 वर्षांच्या महिलेला असे घाणेरडे फोटो व्हॉट्सअपवर आले. 20 नोव्हेंबरला तिने थेट अंबोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार (FIR) दाखल केली. त्यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करून तेलंगणातून आरोपीला ताब्यात घेतलं आणि अंबोली पोलिसांकडे सोपवलं.’ ‘पोलिसांनी तत्काळ तपास करत तेलंगणामधून आरोपीला अटक केली. हा आरोपी आणखी काही मोबाईल नंबरवरून महिलांना अशाच पद्धतीने फोटो आणि व्हिडीओ पाठवत होता.’ दरम्यान, आरोपी सतत आपला मोबाईल क्रमांक आणि ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना तो गुंगारा देत होता. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या तपासात त्याने पवईमधील एका महिला डॉक्टरलादेखील असे फोटो पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु या महिला डॉक्टरने तक्रार दाखल केली नसल्याने त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 'आम्ही डॉक्टर महिलेला विनंती गुन्हा नोंदवण्याची विनंती करणार आहोत आणि आरोपीविरुद्ध पक्का खटला तयार करणार आहोत जेणेकरून त्याला कठोर शिक्षा व्हावी', असं पोलिसांनी सांगितलं.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Cyber crime

    पुढील बातम्या