मुंबई, 08 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनाबाबत अमेरिकेच्या पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर भारतीय सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सनी एक सारखे ट्वीट केले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. गृहमंत्र्यांनी या ट्वीटबद्दल आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका केली.
आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर अनेक कलाकार, खेळाडू यांनी एक सारखे ट्वीट केले होते. यातील शब्द सुद्धा अगदी एकसारखेच होते. या सेलिब्रिटींनी एक सारखे टीव्ट केले का या संदर्भात दबाव नेमका कोणाचा होता का? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सचिव सावंत यांनी केली.
अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्वीट एकसारखेच होते. त्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. गुप्तचर विभागाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सेलिब्रिटींवर कुणी दबाव आणत असेल तर ते गंभीर आहे, असंही सचिन सावंत यांनी सांगितलं.
सचिन सावंत यांच्या मागणीनंतर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर टीका केली आहे.
आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले. 1/2
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 8, 2021
तसंच, कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर, आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!, असा टोलाही शेलार यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, BJP, Congress, Sachin tendulakar