Home /News /mumbai /

'भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना...'; शिवसेनेची सडकून टीका

'भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना...'; शिवसेनेची सडकून टीका

भारतीय जनता पक्षात शिवसेनेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करण्याची कुवत आणि हिंमत नाही. शिवसेनेतच तोडफोड करून त्यातील एखादा शिवसेनेच्या विरोधात उभा केला जातो, असं शिवसेनेनं म्हटलं आहे

    मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं. यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालं (New Government in Maharashtra). हा महाविकास आघाडीसाठी पहिला धक्का होता. यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीतही शिंदे सरकारच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आणि आता आज बहुमत चाचणी होणार आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनेनं सामनातून निशाणा साधला आहे (Saamna Editorial). सामनाच्या अग्रलेखात काय? शिंदे गटाच्या आमदारांच्या जोरावर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणवून घेणारे गृहस्थ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजप असा प्रवास करीत ते विधानसभा अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. कधी, कुठे टांग टाकायची हे त्यांना कळते. भारतीय जनता पक्षात शिवसेनेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करण्याची कुवत आणि हिंमत नाही. शिवसेनेतच तोडफोड करून त्यातील एखादा शिवसेनेच्या विरोधात उभा केला जातो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने जिंकली यात आम्हाला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. राहुल नार्वेकर यांना 164 आमदारांनी मतदान केले. शिवसेनेचे राजन साळवी यांच्या बाजूने 107 मते पडली. शिंदे गटाच्या भाजपपुरस्कृत आमदारांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यामुळे याबाबत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू होईल, पण आता हे सर्व टाळण्यासाठीच विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपने कायद्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीस बसवले व त्याबरहुकूम त्यांना हवे तसे निर्णय घेतले जातील. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना या आमदारांना मतदानात भाग घेऊ देणे बेकायदेशीर आहे, पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का? सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा मोठा प्रवास करून शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळापासून कुलाब्यातील त्यांच्या हॉटेलपर्यंत सुरक्षेसाठी हजारो केंद्रीय जवान दुतर्फा बंदुका घेऊन उभे होते. फक्त हवाई दल व सैन्यच वापरायचे काय ते बाकी होते. कसाबच्या सुरक्षेसाठीही इतके पोलीस नव्हते, पण महाराष्ट्र हा शहीद स्वाभिमानी तुकाराम ओंबळेंचा आहे, हे शिंदे गटाच्या आमदारांनी विसरू नये. आमदार आले, भगवे फेटे घालून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास अभिवादन केले. पण या सगळय़ांचे चेहरे साफ पडलेले दिसत होते. त्यांचे पाप त्यांचे मन कुरतडत आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक चैतन्य व ऊर्जेचा सूर्य आहे, हे भगवे फेटेधारी आमदार काजवेही नव्हते. शिवसेनेत असताना काय ते तेज, काय तो रुबाब, काय ती हिंमत, काय तो सन्मान, काय तो स्वाभिमान…असे बरेच काही होते. ‘‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’’ असे गर्जले जात होते. तसे काही चित्र आता दिसले नाही. कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय? पण हे आमदार कावरेबावरे होऊन केंद्रीय बंदोबस्तात आले व त्यांनी विधानसभेचा अध्यक्ष निवडला. ही निवड बेकायदेशीर आहे, लोकशाही व नैतिक अधिष्ठानास धरून नाही. या अनैतिक कृत्यात आपल्या महामहिम राज्यपालांनी सहभागी व्हावे याचे आता कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. महाविकास आघाडीनेही याआधी राज्यपालांकडे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची परवानगी मागितली होती, पण 15 मार्चला प्रकरण न्यायप्रविष्ट वगैरे असल्याचे सांगून परवानगी नाकारण्यात आली. मग आघाडी काळात जे नियम लावले ते यावेळी का लावू नयेत? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता नाहीच. मुळात शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्र ठरविण्याची नोटीस उपाध्यक्ष महोदयांनी बजावलीच आहे. म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्टच आहे ना? विधानसभा अध्यक्षपदाची निवड ‘हेड काऊंट’ पद्धतीने झाली, पण महाविकास आघाडी सरकारला तशी परवानगी नव्हती. त्यावेळी गुप्त मतदान त्यांना हवे होते. मग राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? डॉ. आंबेडकरांचे की अन्य कोणाचे? त्यांच्या हातातील न्यायाचा तराजू हा सत्याचा की सुरतच्या बाजारातला? हा प्रश्न मराठी जनतेला पडला आहेच. एकनाथ शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत मोठा निर्णय महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्याचा म्हणजे हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे सरकार पायउतार झाल्याचा सगळय़ात जास्त आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा, तर क्रांतिवीर भगतसिंगास लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल तसा नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना त्याच आनंदाच्या भरात राज्यपालांनी पेढा भरवून आनंद व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हा आनंद झाला नव्हता. बहुधा राजभवन परिसरातील पेढय़ांची दुकाने बंद पडली असावीत. श्री. शरद पवार म्हणतात ते विधान गमतीचे असले तरी खरेच आहे. ‘मी आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्री झालो, पण राज्यपालांनी एकदाही पेढा भरवला नाही,’ असे शरद पवार म्हणाले ते बरोबरच आहे. कारण राज्यपाल हा तटस्थ व घटनेचा रखवालदार असतो. मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाचा आला-गेला तरी त्यांना फरक पडत नाही, पण गेल्या दोन-चार वर्षांत महाराष्ट्रातील राजभवनात वेगळेच चित्र दिसत आहे. ‘ठाकरे सरकार’च्या शपथविधीवेळी काही मंत्र्यांनी शपथेची सुरुवात शाहू, फुले, आंबेडकरांच्या नामोच्चाराने केल्याने राज्यपाल भगतसिंह संतापले होते व त्यांनी ही शपथ घटनाविरोधी असल्याचे व्यासपीठावरच सांगून मंत्र्यांना झापले होते. घटनेची व शपथेची ही रखवाली या खेपेस दिसली नाही. घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगोमे आत आणून विधिमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात. फक्त तोंडे दाबलेली डोकीच मोजायची आहेत. महाराष्ट्रात असे वर्तन व राजकारण कधीच घडले नव्हते. शिवरायांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथा घेऊन हे पाप कोणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही. आता प्रश्न राहिला राज्यपालांच्या टेबलावर गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 12 नामनियुक्त विधान परिषद सदस्यांचा. आता नवे सरकार आले आहे. त्यामुळे त्या फाईलच्या जागी नवी फाईल आणून ती चोवीस तासांत राज्यपालांच्या सहीने मंजूर होईल व पेढे भरवण्याचा कार्यक्रम पुनः पुन्हा होत राहील. काळ मोठा कठीण आला आहे हे खरे, पण हा काळाकुट्ट काळही निघून जाईल!
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या