बाके बडवून सत्य मरेल काय?, शिवसेनेनं भाजपला दाखवले 'काळे पान'

बाके बडवून सत्य मरेल काय?, शिवसेनेनं भाजपला दाखवले 'काळे पान'

बहुचर्चित राफेल करारावरून सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा टिकास्त्र डागण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 फेब्रुवारी : बहुचर्चित राफेल करारावरून सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा टिकास्त्र डागण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी गुरूवारी संसदेमध्ये भाषण केले. त्यावेळी त्यांनी राफेलचे समर्थन केलं. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी राफेल प्रकरणातील काळे पान समोर आले. त्यामुळे बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणाऱ्यांची तोंडे बंद झाली असा जोरदार टोला देखील सामनातून हाणला गेला आहे. दरम्यान, गुरूवारी राफेल करारातील मोदींच्या सहभागाचा दस्ताऐवज देखील समोर आला. दैनिक हिंदुनं सारं सत्य लोकांसमोर मांडलं नाही असं भाजपवाले म्हणतात. पण, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाचं काय? विरोधकांना दोष का देता? असा सवाल देखील सामनाच्या आजच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील! असं देखील अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

बाके बडवून सत्य मरेल काय?

जाहीर सभेत तावातावाने बोलावे व झोडपाझोडपी करावी अशाच थाटाचे भाषण आपले पंतप्रधान मोदी संसदेतही करतात. सत्ताधारी पक्षाचे लोक पंतप्रधानांच्या प्रत्येक वाक्यावर बाके बडवीत असतात. पण त्यामुळे संसदेच्या थोर परंपरेत काही भर पडत आहे काय? पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काँग्रेसला ठोकून काढले. चांगलीच सालटी काढली. देशाचे हवाई दल बळकट होऊ नये यासाठीच राफेल करारावर सातत्याने टीका सुरू असल्याचा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेसला लष्कराचे बळकटीकरण नको आहे असे नेहमीचेच आरोप पंतप्रधान करतात व दुसर्‍याच दिवशी राफेल करारात मोदी यांना व्यक्तिगत रस किती टोकाचा होता याबाबतचे कागदोपत्री पुरावे उघड होतात, यास काय म्हणायचे? राफेल करार हा हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांकडून अपेक्षित आहे. राफेलच्या व्यवहारात थेट आपले मोदीच ‘डील’ करीत होते. संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव वगैरे प्रमुख मंडळीना या व्यवहारापासून लांब ठेवले गेले. राफेलच्या किमती ठरवण्यापासून ते हे कंत्राट कुणाला द्यायचे याबाबतचे सर्व निर्णय मोदी यांनीच घेतले आहेत. त्यामुळे आरोप व टीकेचे धनी त्यांना व्हावेच लागेल. ‘चौकीदार चोर है’ हा नारा राहुल गांधी यांनी दिला व तो देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. यास काँग्रेस जबाबदार नाही तर राफेल प्रकरणातली आता उघड झालेली लपवाछपवी कारणीभूत आहे. श्री. मोदी म्हणतात, “तुम्ही मोदींवर टीका करा, भाजपवर टीका करा, पण देशावर टीका करू नका.’’ याचा अर्थ मोदीभक्तांनीच समजावून सांगावा.

संशयास्पद व्यवहार

जो राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे त्यावर खुलासा मागणे ही देशावर टीका कशी काय होऊ शकते? देशात लोकशाही आहे व तिचे खच्चीकरण कोण करीत आहे? लोकशाही व न्याय व्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे व हा अधिकार नाकारणे म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण. साडेचार वर्षांपासून देशावर मोदींचे एकछत्री राज्य आहे. तरीही महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत प्रत्येक गोष्टीचे खापर काँग्रेसवर फोडणे हे स्वतःचे अपयश झाकण्यासारखे आहे. सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले? या प्रश्नाच्या फेर्‍यातून मोदी व त्यांचे सरकार सत्तेचा कालावधी संपत आला तरी बाहेर पडलेले नाही. लोकांनी त्यांना सत्ता दिली, पण सत्ता ही फक्त विरोधकांच्या नाड्या आवळण्यासाठीच वापरली गेल्याने सत्ताधार्‍यांना पुनःपुन्हा काँग्रेसवर टीका करावी लागत आहे. काँग्रेसने देश कमजोर केला हा मोदींचा आरोप मान्य आहे. काँग्रेसवाले चोर, लफंगे, भामटे व डाकू आहेत. प्रत्येक काँग्रेसवाल्यास भरचौकांत फासावर उलटे लटकवायला हवे. काँग्रेस ही शिवी आहे हे सर्व मान्य केले तरी राहुल गांधी यांनी राफेल व्यवहाराबाबत विचारलेले प्रश्न कायम आहेत. पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटीस विकत घेण्यामागचा तर्क काय? व समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत देशाचा प्रत्येक नागरिक हा प्रश्न विचारीत राहील. राजकारणात तळे राखी तो पाणी चाखी हे मान्य, पण येथे समुद्रच गिळला जात आहे. सध्याच्या राजवटीत राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या व्याख्या बदलण्यात आल्या आहेत. राफेल कराराचे भजन गाईल तोच देशभक्त व राफेलच्या किमतीत वाढ करून कुणाचा फायदा केला, असे विचारणारे देशद्रोही. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत केले. राफेलचे समर्थन केले.

देशभक्तीवर भाषण

दुसर्‍याच दिवशी राफेल प्रकरणातले ‘काळे पान’ समोर आले. बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्‍यांची तोंडे त्यामुळे बंद झाली. काँग्रेससह त्यांचे संपूर्ण महागठबंधन म्हणजे महाभेसळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही मोदींच्या भूमिकेशी सहमत आहोत. मात्र त्यांची ही टीका राफेलप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर केल्या जात असलेल्या आरोपांचे उत्तर ठरत नाही. आता राफेल प्रकरणातील मोदींच्या ‘सहभागा’चा एक नवा दस्तऐवज बाहेर पडला आहे. ‘हिंदू’सारख्या प्रतिष्ठत दैनिकाने हा दस्तऐवज शुक्रवारी एका बातमीसह प्रसिद्ध केला आहे. राफेल व्यवहारात पंतप्रधान कार्यालयाकडून ‘समांतर वाटाघाटी’ सुरू होत्या आणि त्यावर संरक्षण विभागाने आक्षेप घेतला होता असे या बातमीत म्हटले असून त्याचा पुरावा म्हणून संरक्षण खात्याच्या अधिकार्‍याचे एक पत्रच त्यात प्रसिद्ध केले आहे. ही बातमी खोडसाळ आणि अर्धवट आहे, ‘हिंदू’ने संपूर्ण सत्य लोकांसमोर मांडलेले नाही, असे आता भाजपवाले म्हणत आहेत. (आम्हीही प्रार्थना करतो की ही ‘फेक न्यूज’ ठरो) पण यानिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे काय? देशाचे संरक्षण आणि ‘राफेल’संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या हल्ल्यानंतर चोवीस तासांत राहुल गांधी यांनी हा प्रतिहल्ला केला आहे. मोदी यांना पक्षात व बाहेर सच्चे मित्र राहिलेले नाहीत. व्यवहारात भावना नसते. राफेलमध्ये व्यवहार आहेच हे पुराव्यानिशी उघड झाले. उगाच विरोधकांना दोष का देता? ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील!

VIDEO : काँग्रेसमुक्त भारत ही महात्मा गांधींची इच्छा - मोदी 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 11:42 AM IST

ताज्या बातम्या